परभणी :२२० लाखांच्या किरायाच्या वाहनांचा प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:37 AM2019-09-05T00:37:10+5:302019-09-05T00:37:35+5:30
जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़
जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, बांधकाम सभापती अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रशासनाच्या वतीने जि़प़तील विविध विभाग प्रमुखांसाठी २२ वाहने किरायाने लावण्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला़ या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी, काँग्रेसचे जि़प़ सदस्य समशेर वरपूडकर यांनी आक्षेप घेतला़ २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने प्रशासन किरायने घेऊ इच्छिते ही बाब चुकीची असून, एवढ्या रकमेत नवीन वाहने जि़प़ला मिळू शकतात़
मग किरायावर एवढी उधळपट्टी कशासाठी करायची? असा सवाल जि़प़ सदस्य चौधरी व वरपूडकर यांनी उपस्थित केला़ यावर प्रशासनाने सदरील विभाग प्रमुखांना वाहन खरेदीचे अधिकार नाहीत़ त्यामुळे ते वाहन खरेदी करू शकत नाहीत, असे सांगण्यात आले़ या संदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव दाखल झाला नाही़ थेट स्थायीतच कसा काय प्रस्ताव आला? वाहन खरेदीचे अधिकार विभागप्रमुखांना नसतील तर तशी नोट सभागृहासमोर सादर करा, आम्ही राज्य शासनाकडे विशेष विनंती करून वाहन खरेदीची परवानगी मागूत, परवानगी मिळालीच नाही तर त्यावर विचार करूत, असे सदस्य म्हणाले़ त्यानंतर काही सदस्यांनी या संदर्भात निविदा काढण्यात आल्या होत्या का? अशी विचारणा केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने निविदा काढण्यात आले असल्याचे सांगितले़ त्यावर तीन वेळा या संदर्भात निविदा काढण्यात आल्या; परंतु, त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही़ प्रत्येक वेळा एकच निविदा आली़ तीच निविदा कशी काय मंजूर करता? असा सदस्यांनी सवाल करून मोठ्या वृत्तपत्रामध्ये या संदर्भात जाहिरात द्या, ज्यामुळे निविदांना प्रतिसाद मिळेल, असे सांगितले़ त्यावर जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी प्रशासनास या संदर्भात नव्याने दरनिश्चिती करा व नव्याने निविदा मागवून घ्या, असे सांगितले़
यावेळी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत लेखा शिर्षाअंतर्गत ३ कोटी ५१ लाख रुपये अंदाजित किंमतीच्या ९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली़ त्यामध्ये जोड रस्ता कानडखेडा ते पूर्णा आबादी रस्ता सुधारणा (अंदाजित किंमत ३९ लाख), पूर्णा आबादी जोड रस्ता कानडखेडा रस्ता सुधारणा (३८ लाख), वझर-खोरवड रस्ता सुधारणा करणे व पूल, मोऱ्या बांधकाम करणे (४७ लाख), देवसडी ते आडगाव रस्ता सुधारणा करणे व पूल बांधकाम करणे (३४ लाख), राज्य मार्ग २४८ पासून जोड रस्ता पांगरी रस्त्याची सुधारणा करणे, पेव्हर ब्लॉक व सीसी रस्ता करणे (३७ लाख), राम भरोसे ते मिर्झापूर पूल बांधकाम व रस्ता सुधारणा करणे (३२ लाख), सुकापूर वाडी ते हट्टा रस्ता सुधारणा करणे (४० लाख), राज्य मार्ग २४८ ते टाकळी कुंभकर्ण सीसी रस्ता, पेव्हर ब्लॉक करणे (४२ लाख), राज्य मार्ग ६१ पासून राज्य मार्ग २३५ ला मिळणारा रस्ता सुधारण करणे व सीसी रोड, पूल, मोºया बांधकाम करणे (४२ लाख) या रस्ता कामांचा समावेश आहे़
गतवर्षी किरायाच्या वाहनांवर २ कोटी रुपयांचा खर्च
४जिल्हा परिषदेतील विविध विभाग प्रमुखांसाठी आणि इतर यंत्रणांसाठी गतवर्षी किरायाने वाहने लावण्यात आली होती़ त्यावर २ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला़ या २ कोटी रुपयांमध्ये जवळपास २० ते २२ नवीन वाहने खरेदी करता आली असती़
४तसेच ती जिल्हा परिषेदच्या मालकीची झाली असती़ त्यामुळे दुसºया वर्षी किरायाने वाहन घेण्याची आवश्यकता लागली नसती; परंतु, गतवर्षी तब्बल २ कोटी रुपये यावर प्रशासनाच्या वतीने खर्च करण्यात आले़
४आता यावर्षीही २ कोटी २० लाख रुपये किरायाच्याच वाहनांवर खर्च करण्याचा प्रशासनाकडून करण्यात आलेला खटाटोप सदस्यांनी हाणून पाडला़ बुधवारच्या स्थायीच्या बैठकीत यावर चर्चा होवून नवीन वाहन खरेदीसह त्यावर कंत्राटी पद्धतीने अंदाजे दरमहा १० हजार रुपये प्रमाणे वाहन चालक नियुक्त करावा, अशीही सूचना यावेळी सदस्यांनी केली़