परभणी : कापडी आच्छादनाने डाळिंब बागांचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:14 AM2019-05-12T00:14:52+5:302019-05-12T00:15:15+5:30
जमिनीतील खोल गेलेली पाणीपातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून टाकळखोपा येथील डांळिंब बाग वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
विजय चोरडिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : जमिनीतील खोल गेलेली पाणीपातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून टाकळखोपा येथील डांळिंब बाग वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यामध्ये ५ ते १० टक्के बागायती शेती आहे; परंतु, यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. जमिनीत पाणी नसल्याने पिकांना पाणी द्यावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे पाण्यासाठी बळीराजाची होणारी ससेहोलपट होत असताना दुसरीकडे तापमानही वाढत आहे. त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. किमान शेतात उभ्या असलेल्या पिकांना वाचविता यावे, यासाठी बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव बुधवंत यांनी दहा एकरवर डाळिंबाची लागवड केली आहे. या शेतकºयाने आपल्या शेतात पिकणाºया डाळिंबासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करून आधुुनिक उत्पादन वाढीवर त्यांचा प्रयत्न आहे. यावर्षी मात्र निसर्गाने त्यांना साथ दिली नाही. सद्यस्थितीला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, उन्हामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने बुधवंत यांनी आपल्या बागेतील सर्वच झाडांना कापडी अच्छादन टाकले असून, उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे.
पिके वाचविण्यासाठी धडपड
जिंतूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे शाश्वत जलस्त्रोतही एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आटले आहे. त्यामुळे टाकळखोपा येथील ज्ञानदेव बुधवंत यांनी दीड हजार डाळिंबाच्या झाडांना कापडी आच्छादन व एक हजारापेक्षा जास्त झाडांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मोठा खर्च केला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाºया तापमानामुळे पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे दिसत आहे.