परभणी : आज थांबणार जाहीर प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:41 PM2019-04-15T23:41:38+5:302019-04-15T23:41:57+5:30
लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़
या मतदार संघात शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खा़ बंडू जाधव, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ २९ मार्चपासून या मतदार संघात जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ ध्वनीक्षेपक, कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा असे प्रचाराचे स्वरुप राहिले़ १८ दिवस उमेदवारांनी दिवसरात्र एक करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला़ अनेक भागात प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत़ या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांच्या सभांच आयोजन केले होते़ या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभा या मतदार संघात झाल्या़ तर महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींच्या सभा झाल्या़ सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली़ तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी अॅड़ प्रकाश आंबेडकर यांची सभा पूर्णा, पाथरी येथे झाली़ या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या़ त्याच प्रमाणे कॉर्नर बैठकांतून विकास कामावंर चर्चा झडल्या़ त्यामुळे या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते़
यावर्षी उन्हाचे प्रमाण अधिक राहिले़ एप्रिल महिन्यांतील १५ दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे नोंद झाले़ त्यामुळे राजकीय पक्ष कार्यकर्र्त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला़ वाढत जाणारे ऊन लक्षात घेऊन सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली जात होती़ ११ वाजेपर्यंत बहुतांश प्रचार फेºया पूर्ण केल्यानंतर दुपारच्या काळात चावडीवरील बैठका, कॉर्नर बैठकांवर भर देण्यात आला़ जाहीर सभांचे नियोजन करतानाही शक्य तो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळा निवडण्यात आल्या़
एकंदर प्रचाराची ही रणधुमाळी आता थांबविण्याची वेळ जवळ आली आहे़ १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत आहे़ त्यामुळे मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवारांकडे शिल्लक असून, या काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न हे उमेदवार करतील़ सायंकाळी ६ नंतर मात्र प्रचार थांबणार आहे़
जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत़ या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाईल, असा अंदाज आहे़
एकंदर निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा मंगळवारी संपणार असून, उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे़ तर दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना अधिक सजग करण्यात आले आहे़
गाठी भेटीवरच द्यावा लागेल भर
४मंगळवार सायंकाळनंतर जाहीर प्रचार थांबणार असल्याने उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभा, पदयात्रा यासारखा प्रचार करता येणार नाही. त्यामुळे मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे या माध्यमातूनच प्रचार करावा लागेल. उमेदवारांकडे दोन दिवस आणि दोन रात्र शिल्लक असून, या काळात किती मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचू शकतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहूनही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवारांना करता येईल.
पथकांची वाढली जबाबदारी
जाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होवू शकतात़ त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाºया हालचालींवर बारकाईने ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवावी लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरुन धावणाºया वाहनांचीही कसून तपासणी करावी लागेल.
प्रशिक्षणात पथक प्रमुखांना सूचना
आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडीओ सर्व्हलन्स टीम, स्टॅटेस्टिक सर्व्हलन्स टीम यासह प्लार्इंग स्कॉड आणि इतर पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण झाले आहे़ त्यांची जबाबदारी काय? त्यांनी कुठल्या पद्धतीने काम करावे, याची माहिती प्रशिक्षणा दरम्यान अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आली आहे़ मंगळवारी सायकाळी प्रचार थांबल्यानंतर या पथकांची जबाबदारी वाढणार आहे़ या दृष्टीनेही बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाºयांना सूचना दिल्या जातील, असे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले़