परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:52 PM2018-09-12T13:52:27+5:302018-09-12T13:53:43+5:30

रेल्वे विभागाने प्रवासाचा अवधी १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

Parbhani-Pune 'fast' train will run 27 kms per hour; Resent due to the slow down of passengers | परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

Next
ठळक मुद्दे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़

परभणी : एकीकडे जग गतीमान होत असताना दुसरीकडे दक्षिण-मध्य रेल्वेने त्याच अंतरासाठी जास्तीचे तास देऊन मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्यायाची भूमिका सुरूच ठेवली आहे़ नांदेड ते पुणे हे ११ तासांचे अंतर असताना रेल्वे विभागाने ते १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाड्यावर वारंवार अन्याय केला जात आहे़ नांदेडहून पुण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात लूझ टाईम दिला जात आहे़ हा लूझ टाईम  कमी करावा, अशी मागणी होत असताना तो वाढविण्यात आला आहे़ 
नांदेड ते पुणे हे ५५६ किमीचे अंतर असून, या अंतरासाठी जलद रेल्वेला ११ तासांचा वेळ निर्धारित केला आहे; परंतु, तो आता १५ तासांवर पोहचला असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिली आहे़ 

२००५-०६ मध्ये नांदेड-पुणे लातूरमार्गे ११ तासांचा प्रवास निर्धारित करण्यात आला़ त्यानंतर हळूहळू या गाडीला लूझ टाईम वाढविण्यात आला़ १२ तास, १३ आणि आता तर चक्क १५ तास निर्धारित करण्यात आले आहेत़ लातूर रोड ते नांदेड हे १८९ किमी अंतर गाठण्यासाठी ७ तास लागणार आहेत. लातूर रोड ते परळी या ६३ किमीसाठी ३ तास १० मिनिटे लागणार आहेत़ केवळ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांच्या फायद्यासाठी  हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे़ गंगाखेड येथून पुण्याला तीन ट्रॅव्हल्स धावतात तसेच एसटी बसची सुविधाही आहे़ नांदेड-पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे टाळले जात आहे़ वारंवार मागणी करूनही या ठिकाणी थांबा दिला जात नाही़ 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून प्रवाशांची सुविधा करण्याचे धोरण निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे़ खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हित जोपासण्याचे धोरण अवलंबिले जात असून, या प्रकाराचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निषेध नोंदविला आहे़ महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ़ राजगोपाल कालानी, रविंद्र मुथा, संभानाथ काळे, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, सुनील जोशी, दिलीपराव दुधाटे, नयना गुप्ता, अनिल देसाई, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमीत कासलीवार, रवि रोडे, ओमसिंग ठाकूर, चंदूलाल बियानी आदींनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका केली आहे़ 

तासी २७ किमीने धावणार जलद गाडी
मराठवाडा विभाागात सर्वसाधारणपणे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़ पुण्याबरोबरच लातूर रोड ते नांदेड या अंतरासाठी ७ तास तर लातूर रोड ते परळी अंतरासाठी ३ तास १० मिनिटे एवढा वेळ खर्ची घालावा लागणार आहे़ विशेष म्हणजे भाडेही वाढविण्यात आले आहे़ रेल्वेच्या स्लिपर टिकीटासाठी २८५ रुपयांऐवजी आता ३७५ रुपये म्हणजे एका तिकीटामागे ९० रुपयांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे़ विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे

Web Title: Parbhani-Pune 'fast' train will run 27 kms per hour; Resent due to the slow down of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.