परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:09 AM2018-12-11T01:09:00+5:302018-12-11T01:09:07+5:30
जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
येलदरी धरणातून तीन जिल्ह्यांमधील शहरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण परिसरातच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणाखाली तीन बंधारे बांधले असून या बंधाºयात एप्रिल महिन्यापर्यंत पाणीसाठा राहतो.
मात्र यावर्षी बंधाºयातील पाणी नोव्हेंबरमध्येच संपले आहे. परिणामी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे या भागातील सावळी, घडोळी, हिवरखेडा, केहाळ, चिंचखेडा, आमदरी, ब्रह्मवाडी, सावंगी म्हाळसा आदी गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणवटे, ओढे, नदीतील डोह आटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
दरम्यान, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाºयासाठी येलदरी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून केली गेली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.
येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने परिसरात खरीप आणि रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न पशुपालकांसमोर असून येलदरी प्रकल्पातून टप्प्या टप्प्याने १२ दलघमी पाणी पूर्णा नदीत सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.