परभणी : परीक्षा केंद्रासाठी राणीसावरगाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:38 AM2018-02-24T00:38:10+5:302018-02-24T00:38:28+5:30
येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले
लोकमत न्यूज नेटवर्क
राणीसावरगाव: येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले.
राणीसावरगाव येथे जिल्हा परिषदेची प्रशाला आहे. अनेक वर्षांपासून दहावीचे परीक्षा केंद्र हे या प्रशालेमध्ये आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. असे असताना येथील जिल्हा परिषद प्रशालेचे परीक्षा केंद्राचे विभाजन करुन अन्य शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यालयाचे संमतीपत्रही घेतले नाही. जिल्ह्यातील कागदोपत्री चालणाºया शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा प्रशालेचे परीक्षा केंद्र कायम ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण मंडळाकडे केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
कृउबाचे संचालक ज्ञानेश्वर जाधव, ओंकार आंधळे, पं.स. सदस्य दत्ता जाधव, भूषण गळाकाटु, गणेश शिंदे, हंसराज जाधव, बंडू स्वामी, राहुल बनाटे, बाळू स्वामी, दत्ता जाधव, समाधान जाधव, केशव जाधव, सुरज जाधव, बसलिंग चलवदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.