परभणी : सोनपेठ तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:26 AM2018-10-07T00:26:27+5:302018-10-07T00:27:49+5:30
तालुका क्रीडा संकुलासाठी जायकवाडी वसाहतीमधील जागेची मागणी करण्यात आली आहे; परंतु, अद्याप जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे जागेअभावी गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे खेळाडूंवर जागा मिळेल तेथे सराव करण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोपनेठ: तालुका क्रीडा संकुलासाठी जायकवाडी वसाहतीमधील जागेची मागणी करण्यात आली आहे; परंतु, अद्याप जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे जागेअभावी गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे खेळाडूंवर जागा मिळेल तेथे सराव करण्याची वेळ आली आहे.
सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय विविध स्पर्धा सुरु आहेत. तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. सोनपेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खेळाडूंची संख्या आहे. मिळेल त्या जागेवर सराव करुन यश मिळविणाऱ्या खेळाडूंना खेळण्यासाठी जागा नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सोनपेठ तालुक्याची निर्मिती होऊन १७ वर्षे उलटली आहेत; परंतु, जागेअभावी व प्रस्तावातील त्रुटीमुळे तालुका क्रीडा संकुलाचे घोंगडे अद्यापही भिजत राहिले आहे. शहरातील जायकवाडी वसाहतीमधील १ हेक्टर ५० आर जागेची मागणी करण्यात आली असून त्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाने गोदावरी पाटबंधारे विभाग औरंगाबाद यांची मान्यता घेण्याचे सूचिविले आहे. त्यासाठी अधीक्षक अभियंता गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडे तसा प्रस्तावही पाठविला आहे; परंतु, दोन वर्षापासून अद्याप त्यास मान्यता मिळालेली नाही. ग्रामीण भागात खेळाचा प्रसार केवळ मैदानाअभावी होत नसल्याने खेळाडूंच्या आशा मावळल्याचे दिसत आहे. क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी क्रीडा प्रेमींमधून होत आहे.
तालुक्याला यावर्षी दोन सुवर्णपदक
यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठस्तरीय ड झोन क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील सय्यद शाहबाज या खेळाडूने उंचउडीमध्ये तर उमेश मुळे याने खो-खो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. सोनपेठ तालुक्यातूच १४ व १९ वर्षे वयोगटातील खो-खोचा संघ विभागस्तरासाठी पात्र ठरला आहे. एवढे उत्कृष्ट खेळाडू तालुक्यात आहेत; परंतु, क्रीडा संकुल नसल्यामुळे मिळेल त्या जागेवर स्पर्धकांना सराव करावा लागत आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी कलिमोद्दीन फारोखी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सोनपेठ येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न जागेच्या हस्तांतरणामुळे रखडला असल्याचे सांगितले.
क्रीडा संकुलाच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आल्यास क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल.
-जीवराज डापकर, तहसीलदार, सोनपेठ