परभणी : जुगार अड्ड्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:21 AM2019-02-27T00:21:10+5:302019-02-27T00:21:37+5:30
जिल्ह्यात सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून २५ फेब्रुवारी रोजी विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून २५ फेब्रुवारी रोजी विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत.
गंगाखेड शहरात जगदंबा देवी मंदिरासमोर जुगार सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी रावसाहेब मारोती शिंदे हा जुगार चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या ताब्यातून १ हजार ८८० रुपये जप्त करण्यात आले.
तसेच तालुक्यातील इसाद गावात विवेक बालासाहेब भोसले व माधव सखाराम भोसले हे दोघे जुगार चालवित होते. पोलिसांनी दोघांवर छापा टाकून जुगारात जमा झालेले ११ हजार १६० रुपये व एक मोबाईल असा १२ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला.
परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभेदार नगर येथे २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा टाकून अफसर खान असद खान आणि अकबर खान हयात खान या दोघांकडून २ हजार ३६० रुपये व एक मोबाईल जप्त केला आहे. या तिन्ही कारवाया पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केल्या.
तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानेही जुगार अड्ड्यावर छापे टाकले आहेत. जिंतूर शहरातील शिवाजी चौक परिसरात एका पानटपरीमध्ये अब्दुल रफीक अब्दुल खालेक हा मुंबई नावाचा मटका घेत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ९२० रुपये जप्त केले आहेत.
मंगळवारी सायंकाळी चारठाणा बसस्टॅन्ड समोर प्रकाश देविदास जाधव हा अवैधरित्या दारु विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून दारुच्या १० बाटल्या आणि नगदी ६५० रुपये, एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थागुशाच्या पथकाने केली.