परभणी रेल्वे स्थानक : एक्सलेटर ‘धक्क्या’ला लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:39 AM2018-07-31T00:39:34+5:302018-07-31T00:39:58+5:30
येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे.
परभणी रेल्वेस्थानक हे दक्षिण मध्य रेल्वे विभागातील आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये समाविष्ट असलेले स्थानक आहे. मात्र या रेल्वेस्थानकावरील विकासकामांना गती मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून ही कामे संथगतीने सुरू आहेत. येथील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी साधारणत: सहा महिन्यांपासून एक्स्लेटर आणि लिफ्ट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. साधारणत: दोन महिन्यांत ही कामे पूर्ण होतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र सहा महिन्यांचा कालखंड उलटला तरीही कामे पूर्ण झाली नसल्याने प्रवाशांची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड आणि मुंंबईकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. परभणी ते मिरखेल दुहेरी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर प्लॅट फॉर्म क्रमांक ३ चा वापर सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरच घेतल्या जातात. तसेच प्लॅट फॉर्म क्र.२ वर परळी, अकोला या मार्गावर धावणाºया गाड्या उभ्या राहतात. तर प्लॅट फॉर्म क्रमांक १ चा वापर केवळ नांदेड, निझामबादकडे जाणाºया रेल्वे गाड्यांसाठीच होतो. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि २ वर प्रवाशांची संख्या अधिक आहे. या सर्व प्रवाशांना दादरा चढून हे दोन्ही प्लॅटफॉर्म गाठावे लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना त्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक्स्लेटर व लिफ्ट सुरू होणे आवश्यक आहे. मात्र ही दोन्ही कामे रेंगाळली आहेत. सहा महिन्यांपासून ही कामे सुरू असून, ती त्वरीत पूर्ण केली जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांनाही दादºयाचा वापर करावा लागत आहे. अनेक वेळा तर धोकादायक पद्धतीने रेल्वे पटरी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
लिफ्ट उभारण्याचे काम रेंगाळले
एक्स्लेटरच्या जोडीलाच स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक २ वर लिफ्ट उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. लिफ्टसाठी बांधकामाचा ढाचा उभारण्यात आला आहे. मात्र त्यापुढील काम सध्या ठप्प पडले आहे. त्यामुळे प्लॅफफॉर्म क्रमांक २ वरील लिफ्टचा ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
परभणी रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सरकत्या जिन्याच्या सर्व पायºया बसविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यावर शेड टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र एक्स्लेटर अद्याप सुरू झाले नाहीत.
४सुरुवातीला एक्स्लेटर नेमके बसवायचे कोठे? यावरुन वाद झाला. यासाठी आलेले साहित्यही अन्यत्र हलविण्यात आले. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र सहा महिन्यांपासून हे कामही पूर्ण झाले नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.