परभणी : पावसाने जिल्ह्यातील पिकांना तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:23 AM2019-09-01T00:23:11+5:302019-09-01T00:23:46+5:30

पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फायदा होणार आहे.

Parbhani: Rain saved crops in the district | परभणी : पावसाने जिल्ह्यातील पिकांना तारले

परभणी : पावसाने जिल्ह्यातील पिकांना तारले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फायदा होणार आहे.
यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. दीड महिन्यापासून पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागात पिण्याचे पाण्याचे संकट गंभीर होत होते. त्याचबरोबर अल्प पावसावर लागवड केलेले खरीप हंगामातील पिके कोमेजण्याच्या अवस्थेत आले होते. सोयाबीन, कापूस या पिकांची वाढ चांगली झाली होती. सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असून कापूस पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेमध्ये पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. वेळेत पाणी मिळाले नाही तर पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते.
याच काळात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण दिवस नागरिकांनी घालमेतील घालविला. सायंकाळच्या सुमारास परभणी, गंगाखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस तुरळक स्वरुपाचा होता. मात्र रात्री ११ वाजेनंतर पावसाने पुन्हा जोर धरला. परभणी शहर परिसरात एक ते दीड तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यानंतर सकाळपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधुन-मधून पावसाच्या सरी होत होत्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहर परिसरात हलका पाऊस झाला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला.
शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, मानवत, पालम, सोनपेठ, पाथरी व पूर्णा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मानवत येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. गंगाखेड शहरातही दुपारी रिमझिम आणि सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील येलदरी, बोरी आणि परिसरातील गावे, सेलू शहर, पूर्णा आणि परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसाने कापूस, सोयाबिन या पिकांना दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरणामुळे झालेला किडीचा प्रादुर्भाव या पावसाने आटोक्यात येण्याची शक्यता आहे. एकंदर शनिवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकºयांच्या चिंता काही दिवसांपुरत्या का होईना; दूर झाल्या आहेत.
सरासरी २१.६३ मि.मी. पाऊस
४शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने शनिवारी सकाळी ८ वाजता घेतली असून २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.६३ मि.मी. पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक ३४.८० मि.मी., गंगाखेड तालुक्यात ३०.७५ मि.मी., सोनपेठ ३० मि.मी., परभणी २६.७५ मि.मी., जिंतूर २६.१७ मि.मी., सेलू १५.२० मि.मी., मानवत १४.३३ मि.मी. तर पाथरी ११ मि.मी.
४पालम तालुक्यात ५.६७ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३१२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४२१. ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. मानवत ३५७.६८, गंगाखेड तालुक्यात ३१८, सोनपेठ ३१६, जिंतूर ३०५.८४, पाथरी २८३.३१, परभणी २८२.३७, सेलू २६६.४०, पालम २६२.३२ मि.मी. पाऊस झाला आहे.
सरासरीच्या ४० टक्के पाऊस
४जिल्ह्यात पावसाळी हंगामामध्ये ७७४.६२ मि.मी. पाऊस होतो. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४०.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ५२ टक्के, सोनपेठ ४५, गंगाखेड ४५, मानवत ४३, जिंतूर, पालम तालुक्यात ३७, पाथरी ३६ आणि परभणी ३५ आणि सेलू तालुक्यात सर्वात कमी ३२ टक्के पाऊस झाला आहे.
गंगाखेडच्या गोदावरी नदीपात्रात टाकला नगरपालिकेने बांध
४गंगाखेड- जायकवाडी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर धारखेड ते गंगाखेड दरम्यान नगरपालिकेच्या वतीने वाळूचा भराव टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहत्या पाण्यात वाळूचा हा बांध टिकेल का, असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.२४ आॅगस्ट रोजी जायकवाडीचे पाणी गोदावरी नदीपात्रात दाखल झाले. २५ आॅगस्ट रोजी सकाळी गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान नगरपालिकेने उभारलेला कच्च्या बंधाºयाला भगदाड पडून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी अडवून शहरवासियांची तहान भागविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
४ त्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी गंगाखेड ते धारखेड या कच्च्या रस्त्यावर वाळूचा भराव टाकून पाणी अडविण्याचे काम हाती घेण्यात आले. मोकळ्या वाळूचा भराव टाकण्याऐवजी वाळू पोत्यात भरुन त्याचा थर लावत दगड, माती व मुरुमाचा भराव टाकावा, अशा सूचना नागरिकांकडून देण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पालिकेने वाळूचा भराव टाकण्याचे काम सुरुच ठेवले होते. दरम्यान, या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता मयुरी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करुन वाळूने भरलेल्या पोत्याचा भराव टाकूनच नदीपात्रातील पाणी अडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Rain saved crops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.