परभणी : घोड्यावरून मिरवणूक अन् ट्रॅक्टरमधून रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:33 PM2019-06-17T23:33:03+5:302019-06-17T23:33:47+5:30
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी रॅली, मिरवणुका काढून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध देखावेही विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी रॅली, मिरवणुका काढून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध देखावेही विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
जिल्ह्यात १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने सोमवारी पहिला दिवस असल्याने शाळांचा परिसर गजबजून गेला होता. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी स्वागत केले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी रॅली काढण्यात आली. परभणी शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पाथरी शहरातील नामांकित आंतराष्ट्रीय माळीवाडा शाळेत नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेला विद्यार्थी संस्कार निळकंठ चव्हाण याची घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. तसेच लेझीम पथकासह वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालक अॅड.निळकंठ चव्हाण, वर्गशिक्षक अशोक कराड, प्रल्हाद गिरी यांचा शालेय शिक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिवाय शाळेतील उपक्रमशील शिक्षक संजय उजगरे यांनी संस्कार चव्हाण याला स्व: खर्चातून विमान प्रवासाचे तिकीट बूक करुन दिले. तसेच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षेत पात्र विद्यार्थी मनोज राजेश डहाळे, आरटीएसई परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनी मोहिनी राजेश डहाळे तसेच पुणे येथील मिशन एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला विद्यार्थी ओमराजे साईनाथ डोंगरे व अंकिता रामराव गिते यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जि.प. शिक्षण विभागातर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व शालेय साहित्यासह खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी वांगीकर, उपाध्यक्ष मीरा नाईक, नगरसेवक गोविंद हरकळ, सिद्धांत चिंचाणे, रवि हरकळ, मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश इखे यांनी केले.
लोकमत : बालविकास मंचच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत
४लोकमत बालविकासमंचच्या वतीनेही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. परभणीतील वैभवनगर येथील बालविद्यामंदिर, एकता नगर येथील गांधी विद्यालय, ओयासीस इंग्लिश स्कूल, बालविद्याविहार, सारंगस्वामी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय आदी ठिकाणी यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले.
४तसेच विद्यार्थ्यांसोबतच मुख्याध्यापक व शिक्षकांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. लोकमत बालविकासमंचच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले.
मानवत शहरात विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून रॅली
४मानवत शहरात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून रॅली काढण्यात आली. या रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी फेटे बांधले होते. रॅलीतील विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, केंद्रप्रमुख शिरीष लोहट, मुख्याध्यापक बनसोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब लाड आदींची उपस्थिती होती.
४शाळा परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष लोहट यांनी केले. याशिवाय झरी येथील जिल्हा परिषद आंतराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी स्वागत केले.