परभणी : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली रामपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:04 AM2019-12-22T00:04:55+5:302019-12-22T00:05:06+5:30
प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.
प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.
गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. सुपीक जमीन, गोदावरीच्या प्रवाहामुळे पाण्याची मुबलक सुविधा अशी नैसर्गिक सुबत्ता गाव परिसरात आहे. या गावाला पौराणिक महत्त्व प्राप्त झाले असून गावाच्या शिवारामध्ये प्रभू श्री रामचंद्राचे वास्तव्य असल्याचे दाखले पुराणात मिळतात. गावातील हनुमानाच्या मुख्य मंदिरासोबतच मोठा मारुती, नवरा हनुमान, दसरा हनुमान, शनी हनुमान अशी गावामध्ये पाच हनुमानाची मंदिरे आहेत तर परिसरातील शेतशिवारात सहा मंदिरे असून, या मंदिरामुळेच या गावाला बारा हनुमंताची रामपुरी, अशी ओळख निर्माण झाली, अशी माहिती कांता महाराज जोशी, नारायण पुजारी यांनी दिली. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमृता आणि पवित्रा या दोन नद्या या ठिकाणी गोदावरी नदीत मिसळतात. त्यामुळे नद्यांचा त्रिवेणी संगम येथे आहे. हनुमान मंदिराबरोबरच गावांमध्ये महादेव मंदिरांचीही शृंखला पाहावयास मिळते. त्यात स्वयंभू मूर्ती असलेले मल्लीकर्जून मंदिर, पापदंडेश्वर, खंडेश्वर, रामेश्वर, काशी विश्वेश्वर, खंडेश्वर, गोकर्णेश्वर, नर्मदेश्वर अशी महादेवाचे मंदिर या ठिकाणी आहेत. या सर्व मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुरातन मंदिरामुळे या गावाला मोठा पौराणिक वारसा निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांचे गाव म्हणूनही ओळख
४परभणी शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर मानवत तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या रामपुरी या गावाला पौराणिक वारस्यामुळे मूळ ओळख असली तरी येथील गावकऱ्यांनी या गावाला अधिकाºयांचे गाव, अशी नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. गावातील युवकांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यातल्या विविध भागात प्रशासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.
४येथील रहिवासी असलेले अनेकजण प्रशासनात ठिक ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अधिकाºयांची गावाशी अजूनही बांधीलकी असून प्रत्येक महिन्यात ते या ठिकाणी येऊन सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये दाखल होणाºया अधिकाºयांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळेच या गावाला आता अधिकाºयांचे गाव म्हणूनही ओळख प्राप्त होत आहे.