परभणी : संचारबंदीमुळे रखडली मालमत्ता कराची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:37 AM2020-04-16T00:37:34+5:302020-04-16T00:38:08+5:30
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़
येथील महानगरपालिकेला कराच्या माध्यमातूनच उत्पन्न प्राप्त होते़ या उत्पन्नामधून मनपा प्रशासन चालविले जाते़ नगरपालिकेचे रुपांतर मनपात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर अनुदान बंद झाले असून, मनपाच्या उत्पन्नातूनच विकास कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च भागविला जात आहे़ मात्र परभणी महानगरपािलकेचे उत्पन्न कमी आहे़ कर वसुली वगळता इतर कोणतेही नवीन स्त्रोत मनपाने विकसित केले नाहीत़ परिणामी करांच्या वसुलीवरच प्रशासनाला अवलंबून राहावे लागत होते़ त्यातही कर बुडविणाºयांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचाही फटका प्रशासनाला सहन करावा लागत होता़ दोन वर्षापूर्वी मनपा प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले़ त्यावेळी नोंद नसलेल्या तब्बल ३० हजार मालमत्ता मनपाच्या सर्वेक्षणात आढळल्या़ त्यामुळे शहरातील मालमत्तांची संख्या ७५ हजार एवढी झाली असून, या मालमत्ता धारकांच्या कराचेही पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे़ परिणामी, मालमत्ता कराची वसुली दुप्पटीने वाढली़ त्याचा एक चांगला परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला आहे़ मात्र मनपाकडे वसुलीचे आव्हान उभे टाकले आहे़ यावर्षी मार्च महिन्यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट कर्मचाºयांना दिले होते़ कर्मचारी वसुलीसाठी कामालाही लागले़ मात्र त्यातच कोरोना या विषाणूजन्य आजाराची धास्ती निर्माण झाली़ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्व यंत्रणा कामाला लागली़ देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आणि त्याचा परिणाम महापालिकेच्या वसुली मोहिमेवरही झाला़ मनपाची वसुली ठप्प पडली आहे़ नागरिक कार्यालयापर्यंत येत नसल्याने वसुली रखडली आहे़ ३१ मार्चपर्यंत महानगरपालिकेला कर वसूल करणे अपेक्षित होते़ त्यात आता आणखी दोन महिन्यांची भर पडली असून, ३१ मे पर्यंत संपूर्ण कर वसुली करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे़