परभणी : लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 AM2018-10-30T00:23:20+5:302018-10-30T00:24:07+5:30
दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़
जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी चर्चे दरम्यान, शिवसेनेचे जि़प़ सदस्य विष्णू मांडे यांनी मानवत तालुक्यात प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना डावलून काम सुरू असल्याचा आरोप केला़ जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई आढावा बैठका घेण्यात आल्या; परंतु, मानवतला बैठक घेण्यात आली नाही़ एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचा आराखडाही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पाठविण्यात आला़ पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशील आहे़ त्यामुळे याबाबतची जाण आम्हालाही आहे; परंतु, लोकप्रतिनिधींना कोणतीही कल्पना न देता ग्रामसेवक चुकीची माहिती वरिष्ठांना देत आहेत़ विशेष म्हणजे ८ ते १५ दिवसांत कधी तरी ग्रामसेवक गावांत येतात़ अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागते़ त्यामुळे प्रशासनाची ही भूमिका अयोग्य आहे़, असेही यावेळी मांडे म्हणाले़ यावर शिवसेनेचे सदस्य राम खराबे यांनी सेलूतील बैठकीला आपणासही बोलावण्यात आले नाही, असे सांगितले़ यावेळी सीईओ बी़ पी़ पृथ्वीराज यांनी प्रशासनाकडून यापुढे काळजी घेतली जाईल, असे सांगितले़ यावेळी सिंचन विभागातील प्रभारी उपअभियंता टने हे १९९५ पासून एकाच जागेवर जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहेत़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी त्यांची जिंतूर येथे बदली केली होती़ काही दिवसच त्यांनी जिंतूर येथे काम केले व पुन्हा ते जिंतूर येथे नियुक्ती असताना परभणीत काम करीत आहेत़ त्यांचे हे लाड कशासाठी प्रशासन करीत आहे? असा सवाल करून सेलू, मानवत, जिंतूर व पाथरी तालुक्यातील शेतकºयांची ते अडवणूक करीत आहेत, असा आरोपही यावेळी विरोधी सदस्यांनी केला़ टने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ यावेळी अन्य काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली़
बुधवारी सर्वसाधारण सभा
४जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी २ वाजता जि़प़च्या सभागृहात होणार आहे़ गेल्या वेळी ही सभा प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित नसल्याने तहकूब करण्यात आली होती़ आता बुधवारी ही सभा होणार असल्याने या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते़