परभणी : नोंदणी लाखांत; काम करणारे मात्र हजारांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:05 AM2019-05-14T00:05:55+5:302019-05-14T00:06:33+5:30
दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन दिल्यानंतरही मजुरांचे कामाच्या शोधार्थ होणारे स्थलांतर थांबलेले नाही. रोहयोकडे मजुरांच्या नोंदणीचा नुसताच आकडा फुगला आहे. मात्र काम मागणाऱ्या मजुरांची संख्या मोजकीच असून, रोहयोच्या कामापेक्षा मोठ्या शहरात जाऊन काम करण्यावरच मजुरांचा भर आहे. परिणामी मजुरांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन दिल्यानंतरही मजुरांचे कामाच्या शोधार्थ होणारे स्थलांतर थांबलेले नाही. रोहयोकडे मजुरांच्या नोंदणीचा नुसताच आकडा फुगला आहे. मात्र काम मागणाऱ्या मजुरांची संख्या मोजकीच असून, रोहयोच्या कामापेक्षा मोठ्या शहरात जाऊन काम करण्यावरच मजुरांचा भर आहे. परिणामी मजुरांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत आणि वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांची कामे रोजगार हमीतून केली जातात. चालू आठवड्याच्या अहवालानुसार ग्रामपयंचायतीची ५८१ आणि यंत्रणांची १४३ अशी जिल्ह्यात ७२४ कामे सुरू आहेत. या कामांवर २९ हजार २७३ मजूर काम करीत आहेत. त्यात सिंचन विहीर, पुनर्भरण, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम ही कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर रोपवाटिका, तुतीलागवड ही कामे यंत्रणांच्या साह्याने केली जात आहेत. जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ४३० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी मागील दोन वर्षांत ज्यांनी कामे केली, त्यांना ‘अॅक्टीव्ह मजूर’ म्हणून गणले जाते. असे १ लाख १९ हजार ४३ अॅक्टीव्ह मजूर जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्यक्षात मागील दोन महिन्यात रोहयोकडे काम मागणाºया मजुरांची संख्या केवळ २१ हजार एवढीच असून, त्यापैकी २० हजार ७६७ मजुरांना रोहयोने काम पुरविले आहे. रोजगार हमी योजनेकडे सद्यस्थितीला ग्रामपंचायतीची ५ हजार ५७३ आणि यंत्रणांची ४ हजार २२९ अशी ९ हजार ८०२ कामे उपलब्ध आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध असताना मजुरांनी या कामांकडे पाठ फिरवली आहे. या कामावर मिळणारी अत्यल्प मजुरी, मजुरीची रक्कम मिळविण्यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवा जमव मजुरांना त्रासदायक वाटत असल्यानेच रोहयोकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे.
रोहयोवर २९ हजार मजूर
४मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात रोहयोची ७२४ कामे सुरु होती. या कामांवर २९ हजार २७३ मजूर होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचीच कामे अधिक कामे होती. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ६५, जिंतूर ६४, मानवत ४२, पालम १६, परभणी ९४, पाथरी १६, पूर्णा १०५, सेलू १११ आणि सोनपेठ तालुक्यात ग्रा.पं.ची ६८ कामे सुरु आहेत.
४तसेच शासकीय यंत्रणांची १४३ कामे सुरु आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात १२, जिंतूर तालुक्यात ३, मानवत ३०, पालम २, परभणी २८ आणि पूर्णा तालुक्यात ६८ कामे सुरु आहेत. पाथरी, सेलू, सोनपेठ या तीन तालुक्यात शासकीय यंत्रणेचे एकही काम सुरु नाही, हे विशेष.
प्रशासनाचे दुर्लक्ष
४दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तलावातील गाळ उपसण्याचे काम या काळात होऊ शकते. मात्र शासकीय यंत्रणांमधील कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग या विभागातून अशी कामे सुरु करण्यात आली नाहीत. त्यामुळे कामेही होईनात आणि मजुरांच्या हाताला कामही मिळेना, अशी परिस्थिती आहे.