परभणी : पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा २ वर्षापासून अहवाल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:56 PM2019-03-15T23:56:33+5:302019-03-15T23:57:02+5:30

जिल्ह्यातील महत्त्वांच्या ९ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून आला नसल्याने हे पूल वाहतुकी योग्य आहेत की नाही, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. परिणामी या धोकादायक पुलांवरुन आजही वाहनधारकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत.

Parbhani: The report of the structural audit of the bridge has been received for two years | परभणी : पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा २ वर्षापासून अहवाल मिळेना

परभणी : पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा २ वर्षापासून अहवाल मिळेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :जिल्ह्यातील महत्त्वांच्या ९ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून आला नसल्याने हे पूल वाहतुकी योग्य आहेत की नाही, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. परिणामी या धोकादायक पुलांवरुन आजही वाहनधारकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत.
आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड- पोलादपूर रस्त्यावरील सावित्री नदीवरील निजामकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत ४२ जणांचा दुदैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातही अशा ९ पुलांचे जवळपास दोन वर्षापूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यानंतर तातडीने या संदर्भातील अहवाल स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास संबंधितांनी देणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत हा अहवाल जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे या जुन्या पुलांवरुन आजही वाहनधारकांना नाईलाजाने वाहने चालवावी लागत आहेत. एखादी घटना घडल्यानंतर तातडीने कारवाईचा दिखावा शासनामार्फत केला जातो. त्यानंतर प्रकरण शांत झाले की, सर्व गोष्टी विसरल्या जातात, असाच काहीसा प्रकार पहावयास मिळत आहे. मुंबई येथील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धोकादायक पुलांचा विषय चर्चेला आला आहे. याबाबतची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कितपत त्वरेने कारवाई करेल, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
राहटी येथील पुलाची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वसमत रस्त्यावरील राहटी येथील पूर्णा नदीवरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या या पुलाला कठडेच नाहीत. त्यामुळे कपडा किंवा काठ्या बांधून कठडे उभारल्याचा आभास बांधकाम विभागाकडून निर्माण केला जातो. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पुलाचे काम करण्याची मागणी अनेक वर्षापासून जिल्हावासियांची असताना त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने लक्ष दिलेले नाही. परिणामी दररोज शेकडो वाहने जीव धोक्यात घालून या पुलावरुन ये-जा करीत आहेत.
सिरसाळा पुलाची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : सोनपेठ- सिरसाळा रस्त्यावरील वाण नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजुने कठडे गायब झाले असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
याबाबत वाहनधारकांनी अनेकवेळा मागणी करुनही त्याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष गेलेले नाही. याशिवाय तालुक्यातील गंगाखेड -सोनपेठ रस्त्यावरील आवलगाव, भिसेगाव, शेळगाव रस्त्यावरील पुलांचीही दयनीय अवस्था झाली आहे.
सुनेगाव जवळील पूल खचला
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील सुनेगावजवळील पूल खचला आहे. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळू शकतो, अशी ग्रामस्थांना भिती आहे. या पुलाची दुरुस्तीही करणे आवश्यक आहे. याशिवाय गंगाखेड- परळी रस्त्यावरील बनपिंपळा रस्त्यावरील पूल, गंगाखेड- राणीसावरगाव रस्त्यावरील इसाद गावाजवळील पूलही धोकादायक झाला आहे. खळी पाटी ते मैराळ सावंगी रस्त्यावरील खळी जवळील पुलाचे कठडे तुटल्याने ट्रॅक्टर पुलावरुन कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नाही.
येलदरीच्या पुलाची ५० वर्षापासून जैसे थे स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी : विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या येलदरी धरणा शेजारच्या पुलाची गेल्या ५० वर्षापासून जैसे थे स्थिती आहे. १९५८ मध्ये धरणाच्या बांधकामाच्या वेळी उभारण्यात आलेल्या या पुलावर नंतर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही.
या अरुंद पुलामुळे मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांची सातत्याने तक्रार असताना त्याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिलेले नाही. परिणामी येलदरीकडील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करावा लागत आहे.
लेंडी नदीवरील पूल नावालाच
४पालम- पालम ते जांभूळबेट या रस्त्यावर लेंडी नदीच्या पात्रात जुना पूल आहे. या पुलाच्या नळ्या मातीने भरुन गेल्या आहेत. तसेच नदीच्या पात्रात दोन्ही बाजुंनी गाळ साचला आहे. त्यामुळे जरा जरी पाऊस पडला तरी पालमचा सहा गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे हा पूल नावालाच असून तो दुरुस्त करण्याची अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
थुना नदीवरील पूल अयोग्यच
४पूर्णा- पूर्णा- झिरोफाटा रस्त्यावरील माटेगाव जवळील थुना नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नेहमीच या रस्त्यावरील वाहतूक पाण्यामुळे बंद पडते. याशिवाय बरमाळ नाल्यावरील पुलाचीही दयनीय अवस्था झाली आहे. तसेच पूर्णा ते ताडकळस मार्गावरील पूर्णा नदीवरील पूलही वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
करपरानदीवरील पुलाने घेतले दोन बळी
४देवगावफाट- जिंतूर- जालना रस्त्यावरील देवगावफाटा जवळील करपरा नदीवरील निजामकालीन पूल अत्यंत अरुंद आहे. शिवाय या पुलाची दुरुस्ती झाली नसल्याने कठडे पडले आहेत. उतरत्या रस्त्यावर पूल असल्याने या पुलावरुन वाहने कोसळण्याच्या घटना घडत असतात. आतापर्यंत या पुलावरुन वाहन कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. विशेष म्हणजे या पुलावर किरकोळही अपघात झाला तरी वाहतूक ठप्प होते.
नवीन पुलाचे बांधकाम रखडले
४सेलू- देवगावफाटा ते सेलू या रस्त्यावरील मोरेगाव येथील दुधना नदीवरील निजामकालीन पुलाचे आयुर्मान संपत आल्याने नवीन पूल बांधण्यासाठी २०१६ मध्ये साडेतीन कोेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाचे काही कामही करण्यात आले; परंतु, निधीच्या कारणावरुन पूल आणि रस्ता जोडण्याचे काम रखडले आहे. परिणामी जुन्याच निजामकालीन पुलावरुन वाहनधारकांना नाईलाजाने ये-जा करावी लागत आहे. या शिवाय तालुक्यातील सेलू- पाथरी रस्त्यावरील कुंडी येथील, सेलू- परभणी रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव येथील पुलांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. त्याकडेही या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
बोरी-वालूर रस्त्यावरील पूल धोकादायक
४बोरी- जिंतूर- सेलू तालुक्याला जोडणाºया कान्हड गावाजवळील ओढ्यावरील पुलाची दयनीय अवस्था झाली असून ३० वर्षांपासून या पूल दुरुस्तीची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याच रस्त्यावरुन बोरीचे ग्रामस्थ वालूरला जातात. थोड्या पावसात या ओढ्यावरील पुलावरुन नेहमीच पाणी वाहते. जिल्हा परिषदेकडून बोरी- वालूर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने साबां विभागानेच या पुलाचे काम करणे अपेक्षित आहे; परंतु, या विभागाचे याकडे लक्ष नाही.

Web Title: Parbhani: The report of the structural audit of the bridge has been received for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.