परभणी : ई टेंडरिंगसाठी रिपब्लिकन सेनेचे घेराव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:00 AM2019-06-11T00:00:20+5:302019-06-11T00:01:14+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़
विद्यापीठात सुरू असलेली गुत्तेदारी पद्धत बंद करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता़ मात्र त्या संदर्भात निर्णय झाला नाही़ त्यामुळे सोमवारी विजय वाकोडे यांच्यासह कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात पोहचले़ विद्यापीठाचे मुख्य गेट बंद करून कुलसचिवांना घेराव घालण्यात आला़ विद्यापीठातील गुत्तेदारांची चिठ्ठी पद्धत बंद करून ई टेंडरिंग पद्धत लागू करावी, १ एप्रिल २००१ रोजी कामावरून कमी केलेल्या मागासवर्गीय मजुरांना गुत्तेदारी पद्धतीमध्ये रोजंदारीचे काम उपलब्ध करून द्यावे, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ कुलसचिव पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली़ ई टेंडरिंग प्रमाणेच कामे देण्यात येतील, असे आश्वासन कुलसचिवांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात एस़टी़ गायकवाड, नितीन गायकवाड, मनोज उबाळे, मनोज कांबळे, प्रभाकर जाधव, संदीप उबाळे, कृष्णा पाचपुंजे, राजू जाधव, प्रशांत तळेगावकर, उमेश भदर्गे, कमलबाई गायकवाड, देवईबाई गायकवाड, संगीता गरुड, धृपदाबाई उबाळे, गंगुबाई जाधव आदींनी सहभाग नोंदविला़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५२ गुत्तेदार कार्यरत आहेत़ गुत्तेदारांच्या यादीत एकाच कुटूंबातील एकापेक्षा अधिक जणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत़ त्यामुळे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त कामगारांवर अन्याय होत आहे़ विद्यापीठ प्रशासन नियमबाह्यपणे खाजगी गुत्तेदारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप यावेळी विजय वाकोडे यांनी केला़