परभणी : जांबवासियांनी केला निर्धार; गाव बनविणार पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:48 PM2019-06-08T22:48:17+5:302019-06-08T22:48:32+5:30
सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.
मागील अनेक वर्षापासून जांब बु. या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिंतूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ सहभाग न नोंदविता गावातील आबाल-वृद्धांनी या चळवळीत श्रमदान केले. गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सीसीटी, अर्दन स्ट्रक्चर यासह जलसंधारणाची अनेक कामे श्रमदानातून पूर्ण केली.
ग्रामस्थांच्या श्रमदानाला सलाम करीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी प्रतिसाद दिला. यामध्ये कर्मचारीवर्ग, विविध सामाजिक संस्था, व्यापारी यांनीही खारीचा वाटा उचलला. सर्वात महत्त्वाचे या श्रमदानासाठी लागणारी जेसीबी मशीन अनुलोम या सामाजिक संघटनेने जांबवासियांना उपलब्ध करून दिली. या जेबीसी मशीनसाठी लागणाºया डिझेलसाठी प्रशासन व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत केली.
विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील जांब बु. या गावाने पाणी फाऊंडेशन उपक्रमांतर्गत येणाºया सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये गतवर्षी या स्पर्धेेत हे गाव जिल्ह्यात प्रथम आले. एवढ्यावरच हे ग्रामस्थ न थांबता यावर्षीही त्यांनी जलसंधारणाची कामे सुरूच ठेवली आहेत. या गावामध्ये झालेली जलसंधारणाची कामे पंचक्रोशीसह जिल्ह्यात आदर्श निर्माण करणारी ठरत आहेत. विशेष म्हणेज या श्रमदानामध्ये गावातील नवयुवक पुढे सरसावले असून त्यांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. सामाजिक संस्थांची मदत व प्रशासनाचा हातभार यावर हे गाव लवकरच जिल्ह्यामध्ये जल बँक तयार करणारे गाव म्हणूून विकसित होताना दिसून येत आहे.
पहिल्याच पावसात साचले पाणी
सततच्या निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जांब बु. ग्रामस्थांनी गतवर्षीपासून पाणी फाऊंडेशन उपकेंद्रांतर्गत श्रमदान करीत गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी व यावर्षी जलसंधारणांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसात खळखळून पाणी वाहिले. श्रमदान करुन उभारलेल्या बंधाºयामध्येही पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे चिज झाल्याचे दिसत आहे.