परभणी :मुद्रांक विक्रीतून मिळाला ६४़८४ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:55 PM2019-04-24T23:55:46+5:302019-04-24T23:56:12+5:30
जमीन, घर खरेदी करण्यासाठी घ्यावयाच्या मुद्रांक विक्रीतून मागील आर्थिक वर्षांत ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुद्रांकाच्या खरेदी-विक्रीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जमीन, घर खरेदी करण्यासाठी घ्यावयाच्या मुद्रांक विक्रीतून मागील आर्थिक वर्षांत ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुद्रांकाच्या खरेदी-विक्रीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़
परभणी जिल्ह्यात मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय कार्यरत आहे़ तालुका आणि जिल्ह्याच्या क्षेत्रात घर, जमीन, शेती खरेदी-विक्रीसाठी मुद्रांकाची खरेदी करावी लागते़ या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला महसूल प्राप्त होतो़ या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ च्या अधिसुची एक मधील नोंदीनुसार खरेदीखत, गहाण खत, बक्षीस पत्र, भाडेपत्र, अदलाबदल पत्र, विकसन करारनामा आदी विविध प्रकारचे दस्त नागरिकांनी खरेदी केले आहेत़
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, आॅक्टोबर महिन्यापासून शेती हंगाम ठप्प आहेत़ या जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांची दरोमदार कृषी क्षेत्रावरच अवलंबून असते़ यावर्षी खरीप हंगामात पिकांच्या उत्पादनात घट झाली़ रबी हंगामात पेरणी घटली तर अनेक भागांत उन्हाळी हंगामावर पाणी सोडून द्यावे लागले़ त्यामुळे कृषी व्यवसाय धोक्यात आला आहे़ त्याचा परिणाम जिल्ह्यातील इतर बाजारपेठांवर होत असल्याचे दिसत आहे़ असे असले तरी घर, जमीन, प्लॉट खरेदी-विक्रीच्या संदर्भात मात्र असा परिणाम झाला नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे़ परभणी येथील जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास २०१८-१९ या वर्षासाठी ६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते़ या तुलनेत ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत या कार्यालयांतर्गत ३० हजार ९७ मुद्रांकांची विक्री झाली आहे. या माध्यमातून ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेवर दुष्काळाचा परिणाम होेत असला तरी मुद्रांकाच्या खरेदीवर मात्र कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़
मार्च महिन्यातच : सर्वाधिक महसूल
४२०१८-१९ या वर्षांतील दस्त विक्रींचा महिनेवारी आढावा घेतला असता मार्च महिन्यात मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास सर्वाधिक १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे़ या महिन्यामध्ये २ हजार ९३१ मुद्रांकांची विक्री झाली़ तर एप्रिल २०१८ मध्ये ३ हजार ६४७ दस्त विक्री झाले असून, ६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे़ मे २०१८ मध्ये ३ हजार २५ दस्तांमधून ५ कोटी, जून २०१८ मध्ये २ हजार ७८३ दस्तांची विक्री झाली असून, ६ कोटींचा महसूल मिळाला़ जुलै महिन्यात ३ कोटी (१ हजार ८३९ दस्त), आॅगस्ट ४ कोटी (२ हजार २३५ दस्त), सप्टेंबर ५ कोटी (२ हजार १६५ दस्त), आॅक्टोबर ४ कोटी (१ हजार ९६२ दस्त), नोव्हेंबर ५ कोटी (१ हजार ७१३ दस्त), डिसेंबर ५ कोटी (२ हजार ३९७ दस्त), जानेवारी ५ कोटी (२ हजार ४०८ दस्त) आणि फेब्रुवारी महिन्यात या कार्यालयास ६ कोटी रुपयांचा (२ हजार ९९२ दस्त) महसूल प्राप्त झाला आहे़
परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक प्रश्न सोडविण्याच्या उद्देशानेच खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले असावेत, असाही अंदाज वर्तविला जात आहे़
१० कोटींनी वाढली मुद्रांक विक्री
परभणी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून २०१७-१८ या आर्थिक वर्षांत २८ हजार ७२५ मुद्रांकांची विक्री झाली होती़ या माध्यमातून ५४ कोटी १५ लाख ९१ हजार ९९० रुपयांचा महूसल प्राप्त झाला होता़ त्या तुलनेत यावर्षी ३० हजार ९७ मुद्रांकांची विक्री झाली असून, ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महूसल प्राप्त झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १० कोटी ६८ लाख ५५ हजार २९१ रुपयांच्या महसुलाची वाढ झाली आहे़