परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:38 PM2019-06-29T23:38:20+5:302019-06-29T23:38:29+5:30
निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व्यक्त करीत आहेत.
प्रधानमंत्री सिंचाई योजनेंतर्गत सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. २०१८-१९ मध्ये या कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तर २०१७-१८ मधील २७ कोटी २८ लाख असा एकूण ५२ कोटी २८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून मार्च २०१९ अखेर ६१२ हेक्टरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
दरम्यान, निम्न दुधना प्रकल्पापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढले असून या कालव्यांच्या माध्यमातून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने दोन्ही कालव्यांची कामे हाती घेण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार या कालव्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून जुलै अखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, परभणी तालुक्यातील काही गावांमधून उजव्या कालव्याचे काम करण्यात आले आहे. त्यापैकी कुंभारी बाजार, कारला, नांदापूर, डिग्रस, मांडवा, काष्टगाव, पिंपळगाव स.मि., वाडी, गोविंदपूर, एकरुखा आदी गावांमध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. काही भागात हे काम अर्धवट अवस्थेत आहे. या कालव्यातून अद्याप पाणीही वाहिले नसताना अनेक भागामध्ये कालव्याची दुरवस्था झाली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी या कालव्याची फरशी उखडून गेली आहे. तर काही भागात कालव्याचा काही हिस्साच ढासळला आहे. त्यामुळे या कालव्यातून पाणी सोडल्यास ते शेवटच्या टोकापर्यंत पोहचेल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. कालव्याची कामे करताना मुरुम, सिमेंट, वाळूचा वापर पुरेश्या प्रमाणात झाला नाही, असा ग्रामस्थांना आरोप आहे.
१६ हजार हेक्टर सिंचन क्षमता
४निम्न दुधना प्रकल्पापासून निघालेल्या उजव्या कालव्याची लांबी ४८ कि.मी. एवढी असून या कालव्याच्या माध्यमातून १६ हजार २९६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र कालव्याचे एकंदर काम पाहता सिंचनामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. सद्यस्थितीला कुंभारी बाजारसह डिग्रस, मांडवा या भागात कालव्याचे काम सुरु आहे. कार्ला परिसरात या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुणवत्तेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
४प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम अनेक ठिकाणी उखडले असतानाही त्याची डागडुजी करण्यात आली नाही. किंवा कामाच्या गुणवत्तेबाबतही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम वेळीच दर्जेदार केले असते तर कुंभारीसह इतर गावातील लाभार्थी शेतकºयांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला असता; परंतु, सद्यस्थितीला कालव्याची परिस्थिती पाहता या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचणे शक्य नसल्याने ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या आहेत.
परभणी तालुक्यातील ज्या भागातून उजवा कालवा गेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या मातीची जमीन आहे. त्यामुळे कालव्याला तडे जाणे किंवा फरशी उखडण्याचे प्रकार झाले आहेत. निविदेतील तरतुदीप्रमाणे काम करण्यात आले; परंतु, काळ्या मातीची खोली लक्षात घेता, सिमेंट कॉंक्रिटचा थर वाढविण्याची आवश्यकता असल्याने ज्या भागात कालवा खराब झाला आहे, तेथे अधिक जाडीचा थर देऊन काम करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. खराब झालेल्या कालव्याची दुरुस्ती होईल.
-सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता