परभणी : काठोकाठ वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी गंगाखेडमध्ये पात्राबाहेर पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:11 AM2019-10-27T00:11:05+5:302019-10-27T00:11:51+5:30
जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि मागील काही दिवसांपासून गंगाखेड परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरुन वाहत असून काही भागात या पाण्याने नदीपात्र सोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि मागील काही दिवसांपासून गंगाखेड परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरुन वाहत असून काही भागात या पाण्याने नदीपात्र सोडले आहे.
चार वर्षानंतर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाल्यामुळे गंगाखेड शहराजवळील नदीपात्रातील सर्व लहान-मोठे मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीपात्र सोडून पुराचे पाणी स्मशानभूमीच्या रस्त्यापर्यंत आले आहे. या पाण्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
जायकवाडी धरणातून पाण्यास विसर्ग होत असल्याने २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली. गोदावरी नदीला पूर येत असल्याने नदीकाठावरील धारासूर, चिंचटाकळी, मैैराळ सावंगी, गौंडगाव, खळी, महातपुरी, दुसलगाव, भांबरवाडी, मुळी, सायाळा, सुनेगाव, धारखेड, झोला, पिंपरी, नागठाणा, मसला आदी गावांसह गंगाखेड शहरालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पुरस्थितीत अशीच वाढ झाली तर वरील गावांना धोका होऊ शकतो. यासाठी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पूरस्थितीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी दिल्या आहेत. गोदावरी नदीत ८३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीपात्रातील पाण्याची उंची ७ मीटर असल्याचे मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले. पुराच्या पाण्यामुळे गोदावरी काठावरील असलेले लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे अस्थीविसर्जन घाटाला पाण्याचे वेढले आहे.
तसेच नृसिंह घाट, तळतुंब घाट, वैष्णव घाट हे घाट पाण्याखाली गेले आहेत. सायाळा, सुनेगाव येथील इंद्रायणी नदीवरील पुलावर दुसºया दिवशीही पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.
दुधना प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर
सेलू- जालना जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात वेगाने पाण्याची आवक होत असून शनिवारी हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर पडला. या प्रकल्पात सध्या १ टक्के जीवंत पाणीसाठा झाला आहे. दोन वर्षांपासून निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि जेमतेम पाऊस होत असल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नाही. त्यातच दोन वर्षापूर्वी असलेल्या पाणीसाठ्यातून अनेकवेळा परभणी, पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुधना नदीपात्रात पाणी सोडले होते. जून महिन्यात देखील परभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. परिणामी हा प्रकल्प मृतसाठ्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने उलटले तरीही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पाची पाणीपातळी वाढली नाही. हा प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने सेलूसह अनेक शहरांवर भविष्यात पाणीसंकट निर्माण होण्याची चिंता होती. मात्र १७ आॅक्टोबरपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आठ दिवसांतच निम्न दुधना प्रकल्पात तब्बल ४८ दलघमी पाण्याची आवक झाली. सद्यस्थितीला या प्रकल्पामध्ये १०४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे मृतसाठ्याच्यावर जीवंत पाणीसाठ्यामध्ये एक टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाळ्याच्या शेवटी का होईना निम्न दुधना प्रकल्प मृृतसाठ्यातून बाहेर आल्याने सेलू शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.