परभणी : हा कसला रस्ता सुरक्षा सप्ताह ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:32 AM2018-04-29T00:32:42+5:302018-04-29T00:32:42+5:30
शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत ठिकठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. याबाबी आवश्यक असल्या तरी प्रशासकीयस्तरावर मात्र सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु, पोलीस प्रशासन मात्र या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढत नसल्याने त्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहेत.
परभणी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १० वर्षांपूर्वी मुख्य चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक, जांब नाका, नारायण चाळ या ठिकाणी बसविलेले सिग्नल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. हे सिग्नल सुरु करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही विभाग पुढाकार घेत नाहीत. परिणामी वर्षानुवर्षापासून लाखो रुपयांची ही यंत्रणा शहरात धूळखात उभी आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
शनिवारी शहरातील वाहतुकीसंदर्भात पाहणी केली असता हीच परिस्थिती दिसून आली. शहरातील वाहनधारक नियमांचे पालन करीत नाहीत आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे जागोजागी वाहतुकीचे नियम मोडत वाहने भरधाव वेगाने चालविली जातात. परिणामी शहरातील वाहतूक असुरिक्षत झाल्याचे दिसत आहे. शनिवारी केलेल्या पाहणीत नानलपेठ परिसरातून शिवाजी चौकात येण्यासाठी प्रवेशबंदी असतानाहीे अनेक वाहनधारकांनी सर्रास व बिनधोकपणे विरुद्ध मार्गाने वाहने चालविल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे बाजारपेठ भागामध्ये सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असताना बाजारपेठेच्या रस्त्यावर अनेक जड वाहने धावताना दिसून आली.
पोलीस प्रशासनाने याविरुद्ध कारवाई केली तरी वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते. मात्र शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहातही वाहतूक नियम डावलणाºया वाहनधारकांवर कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठस्तरावरुन पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
पार्किंगच्या समस्येवर निघेना तोडगा
शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काही दिवसांत नारायणचाळ भागात ही समस्या वाढत चालली आहे. या ठिकाणी दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहने अडकून पडतात तर शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने नानलपेठ, कच्छी बाजार, गुजरी बाजार या भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. दुकानांसमोर रस्त्यावर लावलेली वाहने, हातगाडे यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पाच वर्षांपुर्वी शहरात सम आणि विषम तारखांना पी-१, पी २ पार्किंगचे नियोजन केले होते. बाजारपेठेमध्ये आजही हे फलक दिसून येतात. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वयातून पार्किंगच्या जागा निश्चित केल्या तर वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते.