परभणी : ६ वर्षांपासून रखडला पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:42 AM2019-08-28T00:42:42+5:302019-08-28T00:43:06+5:30
शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सोनपेठ येथून नाथरा मार्गे अंबाजोगाईला जोडणाºया सोनपेठ शहरातील वाण नदीवर २०१३ मध्ये पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षाची मुदत देण्यात आली होती. तरीही संबंधित काम अर्धवट अवस्थेत आहे. परिसरातील नागरिकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सोनपेठ- नाथरा- अंबाजोगाई हा मार्ग पूर्ण झाल्यास गवळी पिंपरी, खपाट पिंपरी, निमगाव, डिघोळ व नाथरा येथील नागरिकांना सोनपेठ ते अंबाजोगाई हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार आहे. तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास या शेतकºयांंना शेतात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा पूल पूर्ण झाल्यास व त्यापुढील रस्त्याचे काम झाल्यास तालुक्यातील नागरिकांचा अंबाजोगाईला जाण्यासाठी पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. बांधकामाला दोन वर्र्षाची मुदतही मिळाली; परंतु, अधिकाºयांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या पुलाचे काम रखडले आहे.
या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली; परंतु, निधीच्या कमतरतेमुळे हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.
-संजय बंडे,
उपविभागीय शाखा अभियंता, सोनपेठ