परभणी : ५० लाख रुपये होईनात वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:23 PM2019-06-05T23:23:27+5:302019-06-05T23:24:01+5:30

भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून मागील पाच वर्षापासून अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही महसूल प्रशासन मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: Rs 50 lakh recovered in Hainan | परभणी : ५० लाख रुपये होईनात वसूल

परभणी : ५० लाख रुपये होईनात वसूल

googlenewsNext

विजय चोरडिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून मागील पाच वर्षापासून अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही महसूल प्रशासन मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
जिंंतूर तालुक्यामध्ये विविध पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच ही नवीन म्हण आता रुढ होऊ पाहत आहे. जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्टÑीय पेयजल या महत्त्वाच्या योजनांमध्ये तालुक्यातील जवळपास १२० गावांना यातून पाणीपुरवठा होतो. मात्र योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे भारत निर्माण योजनेत अपहारित झालेल्या रकमा संबंधितांकडून वसूल करण्याच्या नोटीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. त्याच बरोबर महसूल विभागाला पत्र पाठवून संबंधित रक्कमेचा बोजा अध्यक्ष व सचिवांच्या सातबारावर व मालमत्तेवर टाकावा, असा वेळोवेळी पत्र व्यवहार केला; परंतु, सरकारी काम अन वर्षानुवर्षे थांब, असा अनुभव सध्या जिंतूर तालुक्याला येत आहे. पाच वर्षापासूून पत्र व्यवहार करूनही अद्याप अध्यक्ष व सचिव यांच्या मालमत्तेवर बोजा पडला नाही.
तालुक्यातील नागठाणा येथे २००९-२०१० यावर्षी २७ लाख ६१ हजार रुपयांची भारत निर्माण योजना कार्यान्वित केली होती. मात्र त्या गावच्या समितीच्या अध्यक्षा सुनिता विजय ठमके, सचिव लक्ष्मण झाडे (मयत) यांनी ५ लाख ५३ हजार, ३५० रुपयांचा अपहार केला.
या संदर्भात संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा टाकावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार झाला; परंतु, कारवाई झाली नाही. पोखर्णी व पोखर्णी तांडा येथील समिती अध्यक्षा सविता सुभाष जाधव व सचिव गणेश किशन राठोड यांनी ७ लाख ३७ हजार १७९ रुपयांचा अपहार केला. रायखेडा येथील ज्ञानदेव तुकाराम तिथे, अयोध्या ज्ञानदेव तिथे यांनी ६ लाख २७ हजार ४४२ रुपयांचा अपहार केला. तर ग्रुप ग्रा.पं. मध्ये मानकेश्वर, चारठाणा या गावातील २ लाख २५ हजार ८२९ असा एकूण २ गावातील ८ लाख ५३ हजार ३०१ रुपयांचा अपहार केला. डिग्रस येथील मदन बळीराम घुगे व सुलाबाई माणिकराव घुगे यांनी ९७ हजार ७३४ हजारांचा अपहार केला.
कडसावंगी येथील अच्युत मनोहर अंबोरे व मंगल दत्ता अंबोरे यांनी ४ लाख ९४ हजार १६ रुपयांचा अपहार केला. सोरजा येथील सुरेखा सुभाष कवडे व संजय नारायण आळणे यांनी ६ लाख ५४ हजार ४८९ रुपयांचा अपहार केला. त्याच बरोबर शेवडी येथील भानुदास लिंबाजी सानप व सचिव शोभा रमेश घुगे यांनी ३ लाख ८३ हजार २९० रुपयांचा अपहार केला.
कवी येथील सुमनबाई बाबाराव आंधळे व बाबाराव आंधळे यांनी १० लाख ७९ हजार ७२५ रुपयांचा अपहार केला, असा एकूण भारत निर्माण योजनेंतर्गत ४८ लाख ५३ हजार ८४ रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात संबंधित गावातील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी या रकमा स्वत:च्या खाजगी वापरासाठी वापरल्या. शासनाने वेळोवेळी प्रयत्न करूनही त्या वसूल झाल्या नाहीत. शासनाच्या रकमेचा अपहार महसूल प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०१०-२०११ पासून अनेक वेळा महसूल प्रशासनाला विनंती करून संंबंधित रकमेचा बोजा त्या त्या गावातील अध्यक्ष व सचिव यांच्या नावावर टाकण्याबाबत पत्र व्यवहार केला. वरिष्ठ कार्यालयातील पत्र व्यवहाराला महसूल प्रशासनाने केराची टोपली दाखविली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित तहसीलदारांना तातडीने बोजा टाकण्याबाबत सूचना केल्या. मात्र त्या सुचनांकडे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी दुर्लक्ष केल्याचे मागील नऊ वर्षापासूनचे चित्र आहे.
पाणीपुरवठा योजनेत १०० टक्के गैरप्रकार
४जिंतूर तालुक्यातील जलस्वराज्य, भारत निर्माण योजना, राष्टÑीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना व जीवन प्राधिकरणाच्या योजना अशा एकूण १०० पेक्षा जास्त योजना जिंतूर तालुक्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. लाखो रुपये खर्च झालेल्या योजना गुत्तेदार, समिती अध्यक्ष व सचिव यांनी शासनाला लाखोंचा गंडा घालत गिळंकृत केल्या आहेत.
४तालुक्यातील १७० पैकी १३८ गावांमध्ये या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार होता. मात्र केवळ १० ते १५ योजना सुरू असून बाकीच्या योजना गुत्तेदार व अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी गायब केल्या आहेत.
नवरा-बायकोची मिलीभगत
४भारत निर्माण योजनेंतर्गत विविध गावात नवरा-बायको किंवा नातेवाईकांनी मिळून हा अपहार केला आहे. तालुक्यातील मानकेश्वर, चारठाणा व रायखेडा या दोन्ही गावात नामदेव तुकाराम तिथे व अयोध्या नामदेव तिथे या पती-पत्नीने ८ लाख ५४ हजार ३०१ रुपयांचा अपहार केला. तर कावी येथील सुमनबाई बाबाराव आंधळे व बाबाराव ग्यानबाराव आंधळे या नवरा-बायकोने शासनाला १० लाख ७९ हजार ७२५ रुपयांचा गंडा घातला आहे. नवरा-बायकोने शासनाची केलेली फसवणूक जिंतूर तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

या संदर्भात अपहारित रकमेचा बोजा संबंधित पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या संपत्तीवर टाकावा, याबाबत महसूल प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. शिवाय अध्यक्ष व सचिवांची मालमत्ता कोठे आहे, याचे सविस्तर विवरण महसूल प्रशासनाला देण्यात आले आहे. हे प्रकरण प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे.
-एस.ए. चाहेल,
उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिंतूर

Web Title: Parbhani: Rs 50 lakh recovered in Hainan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.