परभणी : येलदरीच्या विकासासाठी ६५ लाख रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:03 AM2019-02-04T01:03:53+5:302019-02-04T01:04:07+5:30

जिंतूर तालुक्यातील येलदरी या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासनाने ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नुकताच एका आदेशान्वये वितरित करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़

Parbhani: Rs 65 lakh sanctioned for Yeladri's development | परभणी : येलदरीच्या विकासासाठी ६५ लाख रुपये मंजूर

परभणी : येलदरीच्या विकासासाठी ६५ लाख रुपये मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासनाने ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नुकताच एका आदेशान्वये वितरित करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे़ येलदरी जलाशयाच्या मधोमध निसर्गनिर्मित बेट तयार झाले असून, या बेटावर गार्डन विकसित करणे, खेळाचे साहित्य बसविणे तसेच बोटींग सुरू करून पर्यटन विकासाला चालना देणे शक्य आहे़ या दृष्टीने येलदरीच्या विकासासाठी एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता़ २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये या प्रस्तावातून ८० टक्के रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २ फेब्रुवारी रोजी या संदर्भात एक अध्यादेश प्रसिद्ध केला आहे़ त्यात शासनाच्या इको टुरिझम योजनेंतर्गत येलदरीच्या विकासासाठी ६५ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ येलदरी पर्यटनस्थळाचा आराखडा ५ डिसेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाच्या कार्यकारी समितीच्या सभेत मंजूर झाला आहे़ २०१६-१७ ते २०२०-२१ पाच वर्षांचा हा आराखडा असून, तो २ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये एवढा किंमतीचा आहे़ या आराखड्यासाठी २०१८-१९ या वर्षात ७५ लाख ६३ हजार रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने सादर केला होता़
या प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्या़ या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून, औरंगाबाद येथील मुख्य वन संरक्षकांनी खेळणी बसविणे, प्राण्यांचे पुतळे बसविणे यासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती़ त्या ऐवजी १० लाख रुपये या कामासाठी प्राप्त झाले आहेत़ उर्वरित आराखड्यामध्ये ६५ लाख ६३ हजार रुपये प्राप्त असून या प्रस्तावाला राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मंजुरी दिली आहे़
येलदरी हे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकासित करण्यासारखे ठिकाण आहे़ परभणी जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासाठी मोठा वाव आहे़; परंतु, पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात कुठलीही कामे होत नाहीत़ येलदरी येथे पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने निधी मंजूर करून दिला असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
विकासकामांच्या : संथ हालचाली
४येलदरी येथे पर्यटनविकास करण्यासाठी ५ वर्षांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे़ २ कोटी ९९ लाख रुपयांचा हा आराखडा असून, त्यापैकी केवळ ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत़ विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे हा आराखडा मंजुरीसाठी पाठविला होता़ परंतु, निधी उपलब्ध होत नसल्याने येलदरीतील विकास कामे ठप्प आहेत़ चालू आर्थिक वर्षात शासनाने निधी दिला़ परंतु, तो अत्यल्प स्वरुपाचा आहे़ येलदरीचा झपाट्याने विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे; परंतु, प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरील उदासीनतेमुळे येलदरी सारखे निसर्गरम्य स्थळ विकासापासून वंचित राहत आहे़
वाढीव निधीची गरज
जिल्ह्यात जांभूळबेट हे निसर्गरम्य ठिकाण असून, या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे़
मुख्य वन संरक्षकांमार्फत होणार कामे
येलदरी पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या ६५ लाख रुपयांच्या निधीतून औरंगाबाद येथील मुख्य वन संरक्षकांमार्फत कामे केली जाणार आहेत़ हा निधी वितरित करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आहे का? याची खात्री करावी़ त्यानंतरच निधी वितरित करावा, अनुदानातून खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी़ तसेच शासनाच्या आदेशांची अवहेलना होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशा सूचनाही या आदेशात दिल्या आहेत़ तसेच या कामांची सर्व जबाबदारी औरंगाबाद येथील मुख्य वन संरक्षकांवर देण्यात आली आहे़

Web Title: Parbhani: Rs 65 lakh sanctioned for Yeladri's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.