परभणी : टंचाईसाठी ८५ लाखांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:26 AM2018-04-05T00:26:52+5:302018-04-05T00:26:52+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़
प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़
परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या़ परिणामी ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे़ परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता तेवढी अधिक नसली तरी जिंतूर, पालम आणि गंगाखेड या तीन तालुक्यांमध्ये पाणी समस्या अधिक गंभीर आहे़ त्यामुळे प्रशासनाने देखील जिंतूर, पालम, गंगाखेड या तालुक्यांनाच कामे मंजूर करताना प्राधान्य दिले आहे़ जिल्हा प्रशासनाने २९ कोटी रुपये खर्चाचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे़ मात्र प्रत्यक्षात आराखड्यातील कामांना मंजुरी मिळत नसल्याची ओरड वाढली होती़ जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे़
जिल्हा प्रशासनाने जून महिन्यापर्यंतचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालल्याने प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे़ आतापर्यंत ३८ गावांमध्ये नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, चार गावांमध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे़
नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ६७ लाख ४६ हजार ८२७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत़ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी १६ लाख ९९ हजार ६७५ रुपयांच्या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ एकंदर जिल्हा प्रशासनाच्या टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने यापुढे ग्रामीण भागात तातडीने कामे होवून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
जिल्ह्यात २४३ कामे सुरू
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात २४३ कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ ५१ ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत़ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १२३ कामे सुरू झाली आहेत़ नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ३९ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेची ५ आणि नवीन विंधन विहिरींची १५ कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़
जिल्हा प्रशासनाची मंजुरी
जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने आता त्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीमध्ये गावांत पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन विंधन विहिरी घेण्यास जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये मंजुरी दिली आहे़