परभणी : धोकादायक झालेल्या इमारतीतून चालतो कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:59 PM2019-05-17T23:59:56+5:302019-05-18T00:01:05+5:30
धोकादायक झालेली इमारत, अपुऱ्या खोल्या, पावसाळ्यात टीपटीप गळणारा छत आणि जागोजागी छताचे तुकडे पडलेल्या धोकादायक परिस्थितीत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): धोकादायक झालेली इमारत, अपुऱ्या खोल्या, पावसाळ्यात टीपटीप गळणारा छत आणि जागोजागी छताचे तुकडे पडलेल्या धोकादायक परिस्थितीत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.
सोनपेठ, मानवत आणि पाथरी या तीन तालुक्यांसाठी पाथरी येथे राज्य शासनाने आॅगस्ट २०१३ मध्ये पाथरी उपविभागीय कार्यालयाची स्थापना केली. पूर्वी या तालुक्यासाठी सेलू येथे कार्यालय असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. शासनाकडून नवीन उपविभागीय कार्यालयास मंजुरी मिळाल्यानंतर जायकवाडीच्या जुन्या विश्रामगृहाच्या इमारतीत हे कार्यालय थाटण्यात आले. १५ आॅगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयाचे पहिले ध्वजारोहण याच इमारत परिसरात करण्यात आले. कार्यालयाची इमारत १९८९ साली बांधण्यात आली आहे. म्हणजे या इमारतीला आज घडीला ३० वर्षे पूर्णं होत आहेत. या इमारतीत पूर्वी जायकवाडीचे विश्रामगृह, त्यानंतर गोदावरी दुधना कारखान्याचे विश्रामगृह तर काही वर्षे ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. २०१३ मध्ये उपविभागीय कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर किरकोळ डागडुजी केली खरी. मात्र इमारत जुनी असल्याने मोडकळीस आली आहे. या इमारतीत उपजिल्हाधिकारी यांच्यासाठी मोठा हॉल आहे. त्यानंतर त्याच्या बाजूने दोन आॅफीस खोल्या आहेत. १० बाय १० च्या रूममध्ये आवक-जावक, जमा बंदी, अधिकार अभिलेखे तसेच शेतीचा फेरफार हे विभाग कार्यरत आहेत. तर दुसºया १० बाय १० च्या रुममध्ये गौणखनीज, अस्थापना, जमाबंदी हे विभाग कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा अपुरी पडत आहे. कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून काही ठिकाणी इमारतीच्या छताचा भाग कोसळलेला आहे. तर काही ठिकाणी गतवर्षीच्या पावसाने इमारतीच्या प्लास्टरचा पापुद्रा निखळून पडला आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीत कर्मचाºयांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
नवीन इमारतीसाठी हालचाली होईनात
४तीन तालुक्यांचा कारभार पाहणाºया महसूल विभागाच्या या कार्यालयासाठी अद्याप नवीन प्रशासकीय इमारतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या कार्यरत उपविभागीय कार्यालयाच्या इमारत परिसरात मोठी मोकळी जागा आहे. या जागेत नवीन उपविभागीय कार्यालय व्हावे, असे प्रस्तावित आहे. मात्र गेल्या सहा वर्षात यावर निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर उपविभागीय कार्यालयास नवीन इमारत मिळालेली नाही. उपजिल्हाधिकारी यांच्यासाठी माजलगाव रोडवर असणाºया एका इमारतीत निवासस्थान आहे. मात्र इतर कर्मचाºयांना निवासस्थाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन इमारतीसह कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.