परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:12 AM2018-05-17T00:12:47+5:302018-05-17T00:27:02+5:30
भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवन येथे आयोजित सभेत खा़ चव्हाण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर हिंगोलीचे खा़ राजीव सातव, माजी मंत्री आ़ राजेश टोपे, आ़ विजय भांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ रामराव वडकुते, आ़ रोहिदास चव्हाण, आ़ डी़पी़ सावंत, आ़ संतोष टारफे, माजी आ़ सुरेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ भाऊराव पाटील गोरेगावकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, माजी खा़ तुकाराम रेंगे, जि़प़ उपाध्यक्षा भावना नखाते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, हिंगोलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती़
यावेळी बोलताना खा़ चव्हाण म्हणाले की, भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे़ अशक्य काहीही नाही, आपला जिल्हा, आपला मतदार संघ शाबूत ठेवला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम करावे, असे ते म्हणाले़ राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु, राज्य सरकारला याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ शेतकºयांच्या कर्जमाफीची बोगस घोषणा केली़ सरकारला दुष्काळाकडे पाहण्यास वेळ नाही़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे़, असेही ते म्हणाले़
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, जातीयवादी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे़ आज घडीला समाजातील कोणताही घटक समाधानी नाही़ बोंडअळी, पीक विमा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती यासाठी पैसे दिले जात नाहीत़ विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे दिले जात नाहीत़ कर्जमाफीची पोकळ घोषणा करण्यात आली़ त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़ यावेळी खा़ राजीव सातव, माजी आ़ सुरेश देशमुख, आ़ बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले़