परभणी : संक्रांतीसाठी सजला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:01 AM2019-01-14T01:01:34+5:302019-01-14T01:01:43+5:30
मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवत आहे. मागील दोन महिन्यांपासून परभणी शहरातील बाजारपेठेतील उलाढाल जवळपास ठप्प झाली होती. ग्राहकांची संख्या रोडावल्याने व्यापारी आर्थिक कचाट्यात अडकले आहेत. संक्रातीच्या सणावरही दुष्काळाचे सावट पहावयास मिळाले. दरवर्षी या बाजारपेठेत संक्रातीच्या खरेदीसाठी असणाऱ्या गर्दीच्या तुलनेत यावर्षीची गर्दी कमी होती.
संक्रात हा महिलांचा सण असून यानिमित्ताने विविध वस्तुंची, खाद्यपदार्थांची खरेदी होते. येथील गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर परिसर येथे लघु व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेत प्रथमच ग्राहकांची गर्दी पहावयास मिळाली. हळद- कुंकू, रांगोळी, पुजेचे साहित्य, वाण, सुगडे, बिब्याची फुले, वाळूक आदी साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली असून सकाळपासूनच खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या बाजारपेठेत गर्दी कायम होती. जिल्ह्यातील लघुबाजारपेठेत मागील अनेक महिन्यानंतर रविवारी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली.
वाणाच्या साहित्याला मागणी
४संक्रांती सणाच्या काळात वाण देण्याची प्रथा रुढ आहे. यासाठी विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. ग्रामीण भागातून व्यावसायिक परभणीत दाखल झाले आहेत. प्लास्टिक, स्टीलच्या वस्तूंबरोबरच पॉकेट बंद खाद्यपदार्थ वाणासाठी उपलब्ध झाले आहे. पारंपरिक पूजेच्या साहित्याबरोबरच वाणाचीही खरेदी दिवसभरात वाढली होती.
तिळाचे भाव गगनाला
तीळगूळ घ्या, गोडगोड बोला, असे म्हणत तीळगूळ देऊन संक्रांत साजरी केली जाते. यावर्षी तिळाची आवक बाजारपेठेत वाढली आहे; परंतु, भावही त्याच प्रमाणात वाढल्याने संक्रांतीच्या सणावर महागाईचे ढग दिसत आहेत. एरव्ही ८० ते १०० रुपये किलो या दराने मिळणारे तीळ रविवारी मात्र १४० ते १५० रुपये किलो या दराने विक्री झाले. सणानिमित्त मोठ्या प्रमाणात तिळाची खरेदी झाली असली तरी जास्तीचे पैसे मोजून सण साजरा करावा लागत आहे. दुसरीकडे गुळाचे भाव मात्र स्थिर आहेत. रविवारी ४० रुपये किलो दराने गुळाची विक्री झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुºहाळ सुरु झाले असून त्याचा परिणाम गुळाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.