परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:52 PM2019-01-18T23:52:07+5:302019-01-18T23:53:05+5:30
तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे.
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र असून नाथ्रा ते मुदगल या ५० कि. मी. अंतरावर २२ वाळुचे धक्के आहेत. मागील अनेक वर्षापासून या वाळू धक्यातून कधी अधिकृतरित्या तर कधी अनाधिकृतरित्या वाळुचा उपसा होत आलेला आहे. मागील काही वर्षात वाळुला चांगलीच मागणी आली आहे. गोदावरी नदी पात्रात वाळू उपशासाठी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची मान्यता आवश्यक असल्याने नागरिकही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पात्रातील वाळू उपशास विरोध करीत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी तालुक्यात गोपेगाव आणि पिंपरी या दोन गावांच्या कार्यक्षेत्रात वाळुचे लिलाव झाले होते.
लिलाव झाल्यानंतरही या गावात अनाधिकृतरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. गतवर्षी वाळुचा भावही तीन ते चार हजार रुपये ब्रॉस होता. गतवषीर्च्या लिलावातील मुदत सप्टेंबर २०१७ ला संपली. त्यानंतर २०१८-१९ या वर्षासाठी तालुक्यातील वाळू घाटाची महसूल यंत्रणेने लिलाव प्रक्रिया आॅकटोबर, नोव्हेबर या महिन्यात सुरू केली होती.
पाथरी तालुक्यात सात वाळू घाटांच्या लिलावाचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाले होते. मात्र अचानक हरित लवादाने वाळू उपशास बंदी घातली. त्यामुळे जिल्हाभरात अधिकृतरित्या एकही वाळुचा धक्का सुरू नाही. वाळू ठेके बंद असल्याने शासकीय कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. घरकुलाचे काम रखडले आहे. तसेच ग्रामीण भागात नवीन बांधकाम सुरूवात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे खुलेआम वाळू बाजारात उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे चोरट्या वाळूचा बाजारही असल्याचे पहावयास मिळत आहे. गोदावरी नदीच्या पात्रात उपलब्ध असलेल्या ठिकाणी रात्री वाळूची वाहतूक सुरू आहे.
नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. चोरट्या वाळुचा भावही तसाच तेजीत चालत आहे. नाविलाजास्तव म्हणून महागड्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. गोदावरीच्या वाळू पट्यातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असताना तालुका महसूल प्रशासन व जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे फावत आहे.
घरकुलाचे : काम पडले ठप्प
शासनाच्या एका निर्णयानुसार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घरकुल योजनेंतर्गत बांधकामासाठी ४३० रुपये ब्रॉस प्रमाणे वाळू वाटपाचे काम तालुक्यात सुरू झाले होते. मात्र हरित लवादाच्या निर्णयानंतर घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे घरकूल बांधकामेही ठप्प पडली आहेत.
वाळूसाठी लाभार्थ्यांना माराव्या लागतात चकरा
४घरकूल बांधकामासाठी तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी भरून वाळू उत्खनन परवानगी देण्यात येत होती.
४मात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती मार्फत रॉयल्टीची रक्कम भरूनही वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी पंचायत समितीकडे चकरा मारू लागले आहेत.