परभणी : गोदावरीच्या पात्रात रात्रभर वाळूचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:44 PM2019-03-23T23:44:10+5:302019-03-23T23:45:17+5:30
तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.
पालम तालुक्यात गोदावरीच्या नदीचे पात्र मोठे आहे. डिग्रस बंधाऱ्यात डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पात्रातील वाळू उघडी पडली आहे. जागोजाग पात्रात पाणी नसल्याने वाहने रात्रभर फिरत आहेत. पालम, पूर्णा तालुक्यातील दोन्ही बाजूनी वाळू चोरांचे मोठे रॅकेट सक्रीय झालेले आहे.
रात्री १२ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे. महसूल विभागातील पथक रात्री-बेरात्री फिरत असले तरीही या पथकाला हुलकावणी दिली जात आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी जागोजागी महसूल पथकाचा सुगावा लागण्यासाठी माणसे नेमली आहेत. महसूलच्या कर्मचाऱ्यांवर बारिक नजर ठेवली जात आहे.
कर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच गोदावरीच्या पत्रातून वाहने बाहेर काढली जात आहेत. वाहने गोदाकाठच्या शिवारात आजूबाजूला लपविली जात आहेत. महसूल कर्मचाºयांना नदीपात्रात वाळू उपसा करणारी वाहने दिसत नसल्याने पथकाला रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
महसूल पथक परत जाताच पुन्हा वाळूमाफियांकडून रात्रभर वाहनामार्फत वाळू उपसा करून हजार रुपयांना वाळू विकली जात आहे. त्यामुळे गोदाकाठची गावे वाळू चोरांना कंटाळली आहेत. ग्रामस्थ गाढ झोपेत असतानाच ही वाहने नदीपात्रांमध्ये दाखल होत आहेत.
पहाटे लवकरच वाळू घेऊन पसार होत आहेत. याकडे जिल्हा महसूल पथकाने लक्ष देऊन वाळू माफियांना लगाम घालावा, अशी मागणी पालम तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पथकाला केले जाते ‘मॅनेज’
४अवैध वाळूची चोरी करणारी वाहने पकडण्यासाठी महसूल विभागाने पथके तैनात केली आहेत. या पथकातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी यांचे वाळू तस्करांशी लागेबांधे प्रस्थापित झाले आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकारी येत असल्याची कुणकुण वाळूमाफियांना लवकर लागत आहे. त्याच बरोबर वाळू चोरणारी वाहने पकडूनही जागेवरच तोडीपाणी केले जात असून महसूलच्या पथकालाही मॅनेज केले जात असल्याने वाळू चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
निवडणुकीच्या कामामुळे वाळूमाफिया सक्रिय
४लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे सुद्धा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वाळू चोरांना मोठी संधी चालून आली आहे. याचाच फायदा घेत वाळू चोर गोदापात्रातील वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत आहेत.