परभणी : दुधना नदी पात्रातून वाळू उपसा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:57 AM2018-11-22T00:57:37+5:302018-11-22T00:58:27+5:30
तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़
परभणी, मानवत व जिंतूर, सेलू तालुक्यातील काही भागातून दुधना नदी वाहते़ दूधना नदीपात्र पावसाअभावी सध्या कोरडेठाक पडले आहे़ गेल्या काही दिवसांपासून या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे़ याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा महसूल प्रशासनाकडे बेसुमार होणारा वाळू उपसा तात्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी केली आहे; परंतु, याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे़
विशेष म्हणजे या चारही तालुक्यातून वाहणाऱ्या दूधना नदीपात्रात महसूल प्रशासनाच्या वतीने एकाही ठिकाणी वाळू धक्क्याचा लिलाव अद्यापही झालेला नाही़ तरीही वाळू उपसा मात्र रात्रीच्या वेळी जोरात सुरू आहे़ याकडे जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़