परभणी :उरुसात पकडला सराईत चोरटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:54 AM2019-02-06T00:54:48+5:302019-02-06T00:55:08+5:30
येथील उरुसामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका सराईत चोरट्याला अटक केली आहे़ या चोरट्याने ४ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील उरुसामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका सराईत चोरट्याला अटक केली आहे़ या चोरट्याने ४ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़
शहरामध्ये सय्यद हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाला प्रारंभ झाला असून, या उरुसात दर्शन व खरेदीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात़ भाविकांची संख्या वाढल्याने उरुस काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे़ तसेच पेट्रोलिंगही वाढविली आहे़ ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक उरुसात गस्त घालत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी या ठिकाणी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता, एकूण ४ गुन्ह्यांमध्ये या आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे़ मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपीने चोरी केली होती़ या चोरी प्रकरणातील तीन ग्रॅम वजनाची अंगठी, ५ ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर आणि नगदी २६ हजार रुपये असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या आरोपीने जिंतूर कोतवाली आणि सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान,गुन्हा घडला त्यावेळी हा आरोपी अल्पवयीन होता़ आता तो सज्ञान असल्याचेही पोलिसांनी सांगितले़
आरोपीस मानवत पोलीस ठाण्यात हजर केले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर हे तपास करीत आहेत़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे यांच्या पथकाने पार पाडली.