परभणी : चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला २३ प्रवाशांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:42 AM2019-10-06T00:42:49+5:302019-10-06T00:43:28+5:30
बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २३ प्रवासी व वाहकाचा जीव वाचल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळदरी तांडा परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २३ प्रवासी व वाहकाचा जीव वाचल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळदरी तांडा परिसरात घडली.
गंगाखेड बसस्थानकातून पिंपळदरीमार्गे किनगावकडे सकाळी ८ वाजता प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचे ( क्रमांक एम.एच ०६- एस. ८७७३) पिंपळदरी तांडा जवळ असलेल्या उतारावर अचानक ब्रेक फेल झाले. बससमोर चालत असलेल्या पादचाऱ्यांमुळे ब्रेक लावताना ही बाब बस चालक संग्रामअप्पा कल्याणी यांच्या लक्षात आली. त्यामुळे प्रसंगावधान राखून उतारावरील रस्त्यावर गिअरच्या आधारे बसवर ताबा मिळवीत रस्त्याच्या कडेला बस उभी केली. यामुळे बसमधील २३ प्रवासी व वाहक शिवाजी गिते यांचा व स्वत: चालकाचा जीव वाचला. याच परिसरात सुमारे २०० फूट खोल दरी होती. सुदैवाने हा अपघात झाला असता तर बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली असती. केवळ चालक कल्याणी यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा अपघात टळल्याचे प्रवासी बोलत होते. दरम्यान, या घटनेत बसमधील वाहक शिवाजीराव गीते यांच्या छातीत मुक्का मार लागल्याने त्यांच्यावर पिंपळदरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेनंतर दीड तासाने आलेल्या दुसºया बसने प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले.
सहा तासानंतर मिळाली मदत
गंगाखेड आगारातील बसचे पिंपळदरी परिसरात ब्रेक फेल झाल्याची माहिती चालक व वाहकाने आगारात कळविल्यानंतर सुमारे सहा तासानंतर दुपारी ३ वाजता आगारातील मदत तिथे उपलब्ध झाली. तो पर्यंत चालक व वाहकाला बस जवळ ताटकळत बसावे लागले होते.
आठवड्यातील दुसरी घटना
पिंपळदरी परिसरात ब्रेक फेल झालेल्या बसचे गेल्या आठवड्यात अंतरवेलीजवळच ब्रेक फेल झाले होते. ब्रेक लागत नसल्याने अंतरवेली गावापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर बस थांबली होती. याची नोंद ही लॉक बुकला करण्यात आली होती.