परभणी ; संशयिताचा दुसरा स्वॅबही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:25 PM2020-04-12T23:25:36+5:302020-04-12T23:26:02+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दिल्ली प्रकरणातील संशयिताचा दुसरा स्वॅबही निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दिल्ली प्रकरणातील संशयिताचा दुसरा स्वॅबही निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़
दिल्ली प्रकरणातील संशयित व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ त्यानुसार पहिल्या स्वॅबचा ७ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या संशयित व्यक्तीचा स्वॅब दुसºयांदा तपासणीसाठी पाठविला होता़ त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे़ परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ३२० संशयितांची नोंद झाली आहे़ त्यापैकी २८४ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ त्यातील २४४ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असून, २३ अहवाल अजूनही प्रलंबित आहेत़ १२ एप्रिल रोजी एकूण १८ जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़
रविवारी जिल्हा रुग्णालयात १४ जण संशयित म्हणून दाखल झाले असून, त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे़ जिल्हा आरोग्य विभागाने परभणी येथे जिल्हा रुग्णालय तसेच तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातून संशयितांवर उपचार सुरू केले आहेत़
जिल्ह्यात आतापर्यंत ३२० संशयितांची नोंद झाली असून, त्यांपैकी १३० जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे़ २० जण संसर्गजन्य कक्षात दाखल आहेत़ १७० नागरिकांचा विलगीकरण कालावधी संपला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़
६२ जण परदेशातून आलेले
४जिल्ह्यात ३२० संशयितांची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून, त्यापैकी ६२ जण परदेशातून आलेले असून, त्यांच्या संपर्कातील ६ जणांचीही आरोग्य विभागाने तपासणी केली आहे़ मात्र आतापर्यंत सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे १२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली़