परभणी : कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:47 AM2018-11-20T00:47:04+5:302018-11-20T00:47:36+5:30
शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज्ञ असल्याचे पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज्ञ असल्याचे पहावयास मिळाले.
शासकीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन काळात उपाययोजना करण्यासाठी आग नियंत्रण यंत्र बसविण्यात आले. शहरातील गजबजलेल्या प्रमुख कार्यालयांमध्ये हे यंत्र दिसून येते. मात्र संबंधित कार्यालय या यंत्राची व्यवस्थित देखभाल करीत नाहीत. पोलीस ठाणे, पशुवैद्यकीय दवाखाना, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय या कार्यालयांमध्ये आग नियंत्रण यंत्र बसविण्यात आहे; परंतु, या यंत्राची वैधता संपल्याचे पहावयास मिळाले. हे यंत्र अद्यावत करण्यासाठी संबंधित अधिकारी उदासिन असल्याचे चित्र आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना अग्निशमन यंत्राच्या वैधतेविषयी विचारले असता ते कधी करावे लागते, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. गटसाधन केंद्र, महावितरण कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या कार्यालयात आग नियंत्रण यंत्रणाच नसल्याचे दिसून आले.
आग आटोक्यात आणण्यासाठी सामुग्री उपलब्ध नसल्याने महत्त्वाचे दस्ताऐवज तसेच कार्यालयातील साधन सामुग्रीला धोका निर्माण झाला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ प्रमाणात दस्तऐवज असतात. मात्र या कार्यालयातील आग नियंत्रण यंत्रणा तीन वर्षापूर्वीच बाद झाली असून ती अद्यावत करण्यासाठी कार्यालयाने कोणतीच कार्यवाही केली नाही. इतर कार्यालयातील आग नियंत्रण यंत्राच्या वैधता संपल्याचे यंत्रणावरील तारखांवरून दिसून आले. बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळविणारी सज्जता दिसून आली नाही. आपत्ती व्यवस्थापनाचा बागुलबुवा सर्वत्र उभा केला आहे. मात्र आपत्ती आली तरी व्यवस्थापन कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीची इमारत असुरक्षित
तालुका कृषी कार्यालयाप्रमाणे पंचायत समितीचे कार्यालयाही असुरक्षित आहे. या कार्यालयात आग नियंत्रण यंत्रणा दिसून आली नाही. येथील इलेक्ट्रिक व्यवस्था निकामी झाली आहे. त्यामुळे या कार्यालयात केव्हाही आग लागू शकते. या ठिकाणी उपस्थित कर्मचाºयाकडे आग नियंत्रण यंत्राविषयी विचारणा केली तेव्हा हे यंत्र एका कक्षात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. हा कक्ष उघडून दाखवा, असे सांगितल्यानंतर कक्षात मात्र यंत्र आढळले नाही. एकंदर पंचायत समिती कार्यालयाने आगीपासून सुरक्षिततेसाठी कोणतीही यंत्रणा उभी केली नाही. याबाबत गटविकास अधिकारी डी.बी. घुगे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
तहसील, ग्रामीण रुग्णालयाने घेतली काळजी
बहुतांश शासकीय कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली नसल्याचे चित्र पहावयास मिळत असले तरी काही कार्यालयांनी आगीवर नियंत्रण मिळविणारी यंत्रणा अद्ययावत केली आहे. तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वखार महामंडळ या कार्यालयांनी ही यंत्रणा अद्ययावत करून घेतली आहे. तत्त्कालीन तहसीलदार नीलम बाफना यांनी कार्यालयातील संपूर्ण यंत्रणा अपडेट केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. वखार महामंडळाच्या गोदामात करोडो रुपयांचा शेतमाल ठेवला जात असल्याने या कार्यालयानेही संभाव्य धोका ओळखून ५ हजार लिटर पाण्याची टाकी भरून ठेवली आहे. ग्रामीण रुग्णालयातही आगीचा धोका होऊ नये, यासाठी यंत्रणा अपडेट केली आहे. आम्ही दरवर्षी ही यंत्रणा अद्ययावत करतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.
कार्यालयात आग नियंत्रण यंत्र बसविले नसल्याने आगीचा संभाव्य धोका होऊ शकतो. ही यंत्रणा लवकरच बसविण्यात येईल.
-प्रताप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, मानवत