परभणी : १६ हजार कामगारांना सुरक्षा संच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:19 AM2019-07-09T00:19:07+5:302019-07-09T00:20:59+5:30
इमारत बांधकामाशी संलग्नित असलेल्या व्यवसायांमधील कामगारांना मागील दोन महिन्यांपासून सुरक्षा व उपयोगिता संचाचे वाटप केले जात असून आतापर्यंत १६ हजार २२७ कामगारांना या कीटचा लाभ देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : इमारत बांधकामाशी संलग्नित असलेल्या व्यवसायांमधील कामगारांना मागील दोन महिन्यांपासून सुरक्षा व उपयोगिता संचाचे वाटप केले जात असून आतापर्यंत १६ हजार २२७ कामगारांना या कीटचा लाभ देण्यात आला आहे.
बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या कामगारांना जोखमीची कामे करावी लागतात. या कामा दरम्यान कामगारांना सुरक्षा पोहोचविण्यासाठी विविध साधनांची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने यावर्षीपासून सुरक्षा संच व उपयोगिता संच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे आजीव कामगार म्हणून नोंदणी असलेल्या कामगारांना योजनेचा लाभ दिला जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ३२ हजार ४०७ कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी साधारणत: १९ हजार कामगारांनी नूतनीकरण केले असल्याने हे कामगार योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत आहेत.
इमारत बांधकामाच्या व्यवसायाशी निगडित इतर सर्व व्यवसायातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यात सुरक्षा संच आणि उपयोगिता संच अशा दोन प्रकारच्या कीट उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. सुरक्षा संचात हेल्मेट, सेफ्टी शुज, बेल्ट या साहित्याचा समावेश आहे. तर उपयोगिता संचामध्ये बॅटरी आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातून सुरक्षासंच व उपयोगिता संचाचे वितरण सुरु झाले आहे. हे संच वितरित करण्याची जबाबदारी गुणिता व इंडो या दोन संस्थांवर सोपविण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील १६ हजार २२७ कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अजूनही अनेक कामगार आपल्या ओळखपत्राचे नूतनीकरण करुन सुरक्षा संचाचा लाभ घेत आहेत.
येथील दर्गारोडवरील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात मागील काही दिवसांपासून नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नूतनीकरण केलेल्या प्रत्येक कामगाराला सुरक्षा संचाचा लाभ दिला जात असल्याची माहिती जिल्हा सरकारी कामगार अधिकारी ए.ए. देशमुख यांनी दिली.
साडेसहा कोटींच्या शिष्यवृत्तीचा दिला लाभ
४नोंदणीकृत कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये कामगारांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, कामगारांच्या मुलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत तसेच वैद्यकीय खर्चासाठी मदत, प्रसुती काळातील मदत आणि अंत्यविधीसाठी मदत देऊ केली जाते. कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत ६ हजार ८७३ कामगारांना ६ कोटी २४ लाख १५ हजार १०० रुपयांचे वाटप त्यांच्या खात्यावर करण्यात आले आहे.
४तसेच गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठीही प्रति कामगार ३ हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत १ हजार १३ कामगारांना आतापर्यंत ३० लाख ४२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर औजारे खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीअंतर्गत ४ हजार ८२५ कामगारांना त्यांचे औजार खरेदी करण्यासाठी २ कोटी ४१ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी ए.ए. देशमुख यांनी दिली.
नूतनीकरणासाठी वाढली गर्दी
४जिल्हा कामागार अधिकारी कार्यालयातून कामगारांसाठी सुरक्षा कीट दिले जात असल्याने कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. तसेच नूतनीकरण करण्यासाठीही या कार्यालयात सकाळपासूनच जिल्हाभरातील कामगार गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
४नगरपालिका क्षेत्रात काम करणाºया कामगारांना नगरपालिकेतून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणावे लागते. त्याचप्रमाणे आधार कार्ड, बँक पासबुक, तीन पासपोर्ट फोटो आणि रेशनकार्ड इ. कागदपत्रांवर कामगार म्हणून नोंदणी केली जाते. नूतनीकरण करण्यासाठीही हीच कागदपत्रे लागतात.
४एकंदरीत नोंदणी आणि नूतनीकरणााठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.