परभणीत १० जिवंत काडतुसांसह दोन पिस्तुले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:14 PM2020-01-03T13:14:35+5:302020-01-03T13:22:32+5:30
या प्रकरणात एकूण चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
परभणी : शहरातील जिंतूररोड परिसरातील एका जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाच्या बॅगमधून १० जिवंत काडतुसांसह दोन पिस्तुले पोलिसांनी १ जानेवारी रोजी रात्री जप्त केली. आहेत. या प्रकरणात एकूण चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
परभणी येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा वर्षभरापूर्वी खून झाला होता. या खूनप्रकरणातील आरोपी रवि गायकवाड हा एलएलबीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर कारागृहातून सुटला आहे. आरोपी रवि गायकवाड हा १ जानेवारी रोजी दुपारी श्री शिवाजी विधी महाविद्यालयात परीक्षा देऊन परत येत असताना काही जण त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पाळत ठेवत असल्याची माहिती त्याच्या सुरक्षेसाठी नियुक्त पोलिसांना मिळाली. मात्र, कारवाईची भनक लागल्याने तिनही आरोपींनी तेथून पलायन केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार व मनोज भगवानराव पंडित यांना जिंतूर रोडवरील एका जीममध्ये अटक करण्यात आली.
यावेळी फेरोज याच्या बॅगमध्ये काळ्या रंगाचे एक रिव्हॉल्वर, ६ काडतुसे तसेच एक गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसे मिळून आले. तसेच या प्रकरणात आरोपी बो ऊर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख यास त्याच्या राहत्या घरातून कोयता, खंजिरासह ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी बो ऊर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख, शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार व मनोज भगवानराव पंडित आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.