परभणी : विद्युत व्यवस्थापकांची निवड प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:57 AM2018-12-02T00:57:52+5:302018-12-02T00:58:41+5:30
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.
ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला वेळेत त्या गावात जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे.
ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढून ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर महावितरण कंपनीमार्फत ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावेत, असे सूचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या व पाच कि.मी. अंतराच्या आत राहणाºया उमेदवारांचे अर्ज मागविले होते.
३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करून सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र महावितरणमार्फत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.
ग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत विविध कामे करण्यात येणार असून विविध समस्या तत्काळ स्थानिक पातळीवर सोडविल्या जाणार असल्याने या ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या तातडीने करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
दुसरीकडे या प्रक्रियेला सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.
गावातच नोकरी मिळणार या आशेने अर्ज केलेला उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत.
११ ग्रा.पं.ला : मिळेना उमेदवार
मानवत तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ४५ ग्रामपंचायतींना जाहिरातीद्वारे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ११ ग्रामपंचायतींना मात्र पाच कि.मी. अंतरा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रा.पं.च्या प्रस्तावा संदर्भात महावितरणकडे पं.स. कडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही प्रस्तावासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही.
अशी आहेत विद्युत व्यवस्थापकाची कामे
ग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रिडिंग घेणे, वीज देयकाचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अहेड करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसूल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत.