परभणी : सात शहरे केरोसीनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:45 AM2018-10-25T00:45:19+5:302018-10-25T00:47:10+5:30

जिल्ह्यातील सात शहरे केरोसीनमुक्त झाली असून, या शहरांना शासनाकडून होणारा केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे़ परिणामी परभणी जिल्ह्याचे जवळपास १८४ किलो लिटर केरोसीनचे नियतन बंद करण्यात आले आहे़

Parbhani: Seven cities are kerosene-free | परभणी : सात शहरे केरोसीनमुक्त

परभणी : सात शहरे केरोसीनमुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सात शहरे केरोसीनमुक्त झाली असून, या शहरांना शासनाकडून होणारा केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे़ परिणामी परभणी जिल्ह्याचे जवळपास १८४ किलो लिटर केरोसीनचे नियतन बंद करण्यात आले आहे़
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्तभावाने जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना केरोसीनचा पुरवठा केला जातो़ हे केरोसीन स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी केरोसीन रास्त भावाने दिले जाते़ मागील काही वर्षांपासून शहरी भागामध्ये इंधन म्हणून केरोसीनचा वापर कमी झाला आहे़ अनेक शिधापत्रिका धारकांकडेही गॅस जोडणी झाली आहे़ त्यामुळे गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचे केरोसिन कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या अंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांकडून हमीपत्र भरून घेतले जात असून, या हमीपत्रात शिधापत्रिकाधारकांनी गॅस जोडणी नसल्याचे नमूद करणे बंधनकारक आहे़ ज्या शिधापत्रिका धारकाने गॅस जोडणी नाही, असे हमीपत्र दिले, त्याच शिधापत्रिकाधारकाला अनुदानित दरामध्ये केरोसीनचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़ आॅगस्ट महिन्यामध्ये शासनाने हे निर्देश दिले़
शासनाच्या या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित केले जाणारे केरोसीन ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच वितरित करण्याचेही सूचित केले आहे़ गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिका धारकांना अनुदानीत दराच्या केरोसीनमधून वगळण्याची मोहीमही राबविण्यात आली़ गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांची अचूक माहिती उपलब्ध होत नसल्याने शिधापत्रिका धारकांकडूनच गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र मागविण्यात आले़ ज्या शहरांमध्ये शिधापत्रिकाधारकांनी असे हमीपत्र दिले नाही, त्या शहरांचे केरोसीन कमी करण्यात आले आहे़
परभणी जिल्ह्यात परभणी शहरासह पूर्णा, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, सेलू आणि मानवत ही सात शहरे केरोसीनमुक्त झाली असून, या शहरांसाठी येणारा केरोसीनचा कोटा दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे सध्या केवळ ग्रामीण भागासाठी आणि उर्वरित सोनपेठ आणि पालम या दोन शहरांसाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केरोसीन पुरवठा केला जात आहे़
शासनाच्या निर्देशानुसार बिगर गॅस जोडणीधारक शिधापत्रिका धारकांनाच केरोसीनचा पुरवठा केला जात आहे़ सप्टेंबर महिन्यापासून या प्रणालीस सुरुवात झाल्यामुळे परभणी जिल्ह्यात गॅस जोडणी असलेल्या शहरी भागातील केरोसीनचा कोटा बंद केला आहे़
तर होणार : शिधापत्रिकाधारकांवर कारवाई
४बिगर गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच अनुदानीत दरातील केरोसीन वितरित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत़ त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्याकडे गॅस जोडणी असेल तर त्यांची नावे केरोसीन विक्रेत्याकडे नोंदवावीत किंवा गॅस जोडणी नसेल तर तसे हमीपत्र केरोसीन विक्रेत्यांकडे दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी केले आहे़
४केरोसीन आणि गॅस या दोन्हींचा लाभ शिधापत्रिकाधारक घेत असल्याचे निर्दशनास आल्यास अशा शिधापत्रिकाधारकांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिला आहे़
बंद झालेला केरासीनचा कोटा
शासनाच्या निर्देशानुसार परभणी ४८ केएल, पूर्णा २४ केएल, गंगाखेड २४ केएल, पाथरी १८ केएल, जिंतूर २२ केएल, सेलू २४ केएल आणि मानवत शहराचा २४ केएल केरोसीनचा कोटा सप्टेंबर महिन्यापासून बंद करण्यात आला आहे़

Web Title: Parbhani: Seven cities are kerosene-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.