परभणी : पाण्यासाठी जमिनीची केली जातेय चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:55 AM2019-05-16T00:55:20+5:302019-05-16T00:55:40+5:30
तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.
तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चार वर्षापासून सातत्याने दुष्काळीची परिस्थिती असल्याने यावर्षी पाण्याची टंचाई वाढली आहे. मागील वर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडले होते. या पाण्याने काही काळ तग धरला. आता मात्र पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. बागायती केळी, ऊस ही पिके हातची गेली आहेत. शेतकरी पाण्यासाठी विहिरींचे खोदकाम करीत आहेत. ५० ते ६० फूट विहीर खोदूनही पाणी लागत नाही. तर बोअरवेल ५०० फुटापर्यंत खोदल्यानंतरही कोरडा फुफाटा बाहेर पडत आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी खोलवर खोदूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात चार महिन्यांमध्ये १०० बोअर खोदण्यात आले. एक बोअर घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यातील बोअरवरील खर्चाचा अंदाज लावला तर ४० लाख रुपये केवळ पाणी शोधण्यासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे बोअर खोदकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.
२ हजारांपेक्षा अधिक: तालुक्यात बोअरवेल
४डिसेंबर २०१८ पासूनच तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर खोदकामावर भर दिला आहे. मागील चार महिन्यांमध्ये तालुक्यात सुमारे २ हजार पेक्षा अधिक बोअर घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर ५०० फुटापर्यंत खोदले. खोलवर बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने खोदकामावरील खर्च वाया जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून सिंचनासाठीही पाणी नसल्याने बागायती पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जायकवाडीचे पाणी मिळाल्यास टंचाई होईल शिथिल
४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे टंचाई शिथिल झाली होती;परंतु, आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
४या प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा कालव्याला सोडले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. शिवाय कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून विहिरी, हातपंपांना पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.