परभणी: मेंढपाळास तीन दिवस ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:30 AM2019-09-09T00:30:50+5:302019-09-09T00:31:39+5:30
वन क्षेत्रातील जमिनीवर मेंढ्या चारल्याच्या कारणावरून मेंढपाळ सदाशिव बोरकर यांना तीन दिवस वन विभागाच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले़ ही माहिती समाजताच धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी ३ सप्टेंबर रोजी वन अधिकऱ्यांना धारेवर धरत मेंढपाळाची सुटका केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): वन क्षेत्रातील जमिनीवर मेंढ्या चारल्याच्या कारणावरून मेंढपाळ सदाशिव बोरकर यांना तीन दिवस वन विभागाच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले़ ही माहिती समाजताच धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी ३ सप्टेंबर रोजी वन अधिकऱ्यांना धारेवर धरत मेंढपाळाची सुटका केली़
बुलडाणा जिल्ह्यातील सदाशिव सूर्यभान बोरकर हे मेंढ्यासह जिंतूर तालुक्यात आले होते़ आडगाव भागातील वन परिक्षेत्रात जमिनीवर संबंधिताने मेंढ्या चारल्याचा वन विभागाचा आरोप होता़ वन विभागाने ३ सप्टेंबर रोजी सदाशिव सूर्यभान बोरकर यास ताब्यात घेतले तर त्याच्यासाबत असलेल्या तीन महिला व तीन पुरुषांसोबत जवळपास ५०० मेंढ्यांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागेवरच नजर कैदेत ठेवले़ ही माहिती समजताच धनगर समाजामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़ त्यानंतर समाज बांधवांनी परभणी येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात धाव घेतली़ ६ सप्टेंबर रोजी वन विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना धारेवर धरत या मेंढपाळाची तीन दिवसांनी सुटका केली़
यावेळी सुरेश भुमरे, अनंत बनसोडे, प्रकाश शेवाळे, कुबेर हुलगुंडे, दीपक शेंद्रे, अनंतराव कोरडे, काशीनाथ घनवटे, ज्ञानेश्वर आव्हाड, दिगंबर जावडे, रामा जावडे, पंढरी जावडे, गणेश कानडे यांची उपस्थिती होती़
वन विभागाचे आडमुठे धोरण
वन विभागाने मेंढपाळाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज होती़ परंतु, कारवाई न करता त्यांना डांबून ठेवण्यात आले़ या संदर्भात कोणती कारवाई झाली की नाही, याचे स्पष्टीकरण या विभागाकडे अद्यापही नाही़ वन परीक्षेत्रात मेंढपाळाने जर मेंढ्या चारल्या असतील तर घटनास्थळाचा पंचनामा होणे गरजेचे होते़ परंतु, संबंधिताला डांंबून ठेवून वन विभागाला काय मिळाले, हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे़ दरम्यान, या संदर्भात तालुका वनपरीक्षेत्र अधिकाºयांशी संपर्क साधला असता आपण जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत आहोत, आपणास नंतर माहिती दिली जाईल, असे म्हणत दूरध्वनी बंद केला़ त्यानंतर वारंवार दूरध्वनी लावूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही़