परभणी : रोहित्रासाठी शिवसेनेचा महावितरणला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:17 AM2018-11-06T00:17:29+5:302018-11-06T00:18:01+5:30
जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़
जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या निधीतील २०० विद्युत रोहित्र नांदेडला वळविल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळत नसताना हे विद्युत रोहित्र परस्पर पाठविल्याने सोमवारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालय गाठून घेराव आंदोलन केले़ या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आ़ पाटील यांनी केली़ भ्रमणध्वनीवरून नांदेड येथील मख्य अभियंत्यांशी संपर्क साधून त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यावर मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे आश्वासन दिले़ दरम्यान, या प्रश्नी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ़ पाटील यांनी सांगितले़ जिल्हा नियोजन समितीतून अनेक गावांसाठी रोहित्र मंजूर झाले होते़ मात्र सध्या रोहित्र मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ रबी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले असताना केवळ विजेअभावी पाणी देता येत नाही़ दुष्काळी परिस्थितीतही महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत़ याबद्दल संताप व्यक्त करीत आ़ पाटील यांनी कार्यकारी अभियंता लोंढे यांना जाब विचारला़ यावेळी माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, अनिल डहाळे, रवि पतंगे, नवनीत पाचपोर, शिवाजी चोपडे, दामोधर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, संजय गरुड, सुभाष बागल, कैलास भेंडे, लक्ष्मण भालेराव, कदम, विजू काळे, गोविंद काळे आदी उपस्थित होते.