परभणी : शिवसेना-भाजपा युतीने बदलली समीकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:56 AM2019-02-20T00:56:42+5:302019-02-20T00:57:08+5:30
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़
अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़
सध्याच्या घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला असता शिवसेना-भाजपाच्या युतीने काही जणांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे काही नेते भाजपात गेले होते़ त्यानंतर झालेल्या परभणी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यातच थेट लढत झाली होती़ त्यावेळी शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी भाजपाचा दणदणीत पराभव केला होता़ त्यानंतर गेल्या पाच वर्षांत आ़ पाटील यांनी मतदार संघात भाजपाची सातत्याने गोची केली आहे़ दुसरीकडे त्यांचे संघातील पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत़ या पार्श्वभूमीवर आता भाजपा-शिवसेनेची युती झाल्याने भाजपात गेलेल्या काही नेत्यांची गोची झाली आहे़ त्यामुळे भाजपातील काही नेते काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघ आघाडीतील जागा वाटपानुसार काँग्रेसकडे असल्याने भाजपावासी नेत्यांना घरवापसीतून पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटाची अपेक्षा वाटू लागली आहे़ यातील सत्यता लोकसभा निवडणुकीतील प्रचारावरूनच स्पष्ट होणार आहे़
पाथरी विधानसभा मतदार संघातही आ़ मोहन फड यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार पाथरीची जागा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेला कंटाळूनच आ़ फड हे भाजपात गेले आहेत़ आता शिवसेना-भाजपाची युती झाल्याने ते पाथरीची जागा शिवसेनेकडून सोडून घेऊन भाजपाकडूनच लढतात की गेल्या वेळी प्रमाणे मित्र मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे़ पाथरी मतदार संघात आ़ फड यांच्या व्यतिरिक्त भाजपाची फारशी ताकद नाही़ त्यामुळे आ़ फड यांच्या पक्षात आसण्याचा भाजपाला फायदा आहे़
गंगाखेड विधानसभा मतदार संघाची जागा, युतीतील जागा वाटपानुसार भाजपाचा मित्र पक्ष रासपकडे आहे़ गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा रासपकडून येथे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी त्यांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून कितपत सहकार्य मिळेल, या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ गंगाखेड नगरपालिकेत भाजपाच्या सहकाºयानेच रासपच्या उपनगराध्यक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पायउतार केले होते़ ही सल गुट्टे यांच्या मनात आहे़ त्यामुळे ते भाजपा नेत्यांशी कितपत जुळून घेतात, या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़
जिंतूर विधानसभा मतदार संघात माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामुळे भाजपा मजबुत स्थितीत आहे़ त्यामुळेच राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे आणि माजी आ़ बोर्डीकर यांच्यातच मतदार संघाचे राजकारण सातत्याने रंगत असते़ गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बोर्डीकर यांनी शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांना उघडपणे मदत केली होती़ त्याचा खा़ जाधव यांना फायदाही झाला़ आता बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर याच लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत़ तशी त्यांनी भाजपाकडून तयारीही सुरू केली होती़ आता शिवसेना-भाजपाची युती झाल्याने मेघना बोर्डीकर या भाजपात राहून विधानसभेची तयारी करणार की भाजपातून बाहेर पडून इतर पक्षांचे तिकीट मिळवून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे़
चारही विधानसभा मतदार संघावर परिणाम
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात शिवसेना- भाजपाच्या राज्यस्तरावरील युतीचा परिणाम होणार आहे़ परभणी लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेलाच भाजपाच्या मदतीची गरज लागणार आहे़ त्यामुळे भाजपाचे नेते शिवसेनेला कितपत मदत करतील, हेही पाहावे लागणार आहे़ भाजपाच्या काही नेत्यांचे खा़ जाधव यांच्याशी मतभेद आहेत़ आता हे मतभेद दूर ठेवून दोन्ही पक्षांचे नेते लोकसभेचे काम करणार की पडद्यामागे राहून खेळी करणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे़ गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची परभणीत सभा झाली होती़ यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत कोण-कोणत्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होतात, याकडेही कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे़