परभणी : १५ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:41 PM2019-04-08T23:41:35+5:302019-04-08T23:42:00+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली.
दरवर्षी पर्जन्यमानात होत असलेली घट पाहता तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी ५० गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याअंतर्गत प्रशिक्षणातून परतलेल्या अरबूजवाडी, येळेगाव, सिरसम, मरडसगाव, मालेवाडी, सुप्पा खालसा, सुप्पा जहागीर, हरंगुळ, डोंगरजवळा, गुंजेगाव, बडवणी, घटांग्रा आदी गावातील ग्रामस्थांनी हालगी, सनई, टाळ, मृदंग वाजवून गावात दवंडी देत पाणी फाऊंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला. पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब गाव शिवारात अडविण्यासाठी श्रमदानाची मशाल पेटवित ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून गाव शिवारात परिसरात श्रमदान करण्यास सुरुवात केली. अरबूजवाडी येथे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून सुरू झालेल्या या श्रमदानाच्या कामात गोदावरी तांडा, अरबूजवाडी, वागदरा, डोंगरजवळा, इळेगाव, सिरसम, मालेवाडी सुप्पा खालसा आदी गावात रात्री १२ वाजता ८१७ ग्रामस्थांनी श्रमदानाला सुरुवात केली. यशस्वीतेसाठी पाणी फाऊंडेशनचे समन्वयक रवीकर्ण इंगोले, राजेभाऊ कदम, बाळासाहेब गुळभिले आदी प्रयत्न करीत आहेत.
सिंचनास होणार मदत
पाणी फाऊंडेशनच्या वतीने गंगाखेड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत यावर्षी ५० गावांनी सहभाग घेतला आहे. त्यातील बारा गावातील ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी प्र्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. उर्वरित ३८ गावातील ग्रामस्थ येत्या काळात काम सुरू करणार आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये तालुक्यातील ५० गावांमध्ये पाणी अडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुष्काळात या गावांना दिलासा मिळणार आहे.