परभणी : तीव्र उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:43 AM2019-04-22T00:43:09+5:302019-04-22T00:44:05+5:30
जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून नागरिक दुष्काळाचा सामना करीत आहे. मार्चपासूनच ऊन तापू लागले आहे. जवळपास एक महिनाभर उन्हाचा पारा ४० अंशांपेक्षा अधिक नोंद झाल्याने नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागला.
मध्यंतरी वातावरणात बदल होऊन अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली होती; परंतु, १९ एप्रिलपासून पुन्हा तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, पंखे, कूलर्स आणि एसीचा वापर वाढला आहे. दिवसा शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे दिवसभर प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेतही शुकशुकाट पहावयास मिळत असून सायंकाळनंतर मात्र हळूहळू सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना उपाय करावे लागणार आहेत.
उन्हाच्या पाºयाने गाठली चाळिशी
४जिल्ह्यात यावर्षी तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. साधारणत: एक महिन्यापासून जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशापेक्षा पुढे सरकल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ व १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात ४२.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. १५ रोजी ४०.७ अंश तापमान नोंद झाले.
४१६, १७ व १८ एप्रिल असे तीन दिवस जिल्ह्यामध्ये वादळी वाºयासह पाऊस झाल्याने तापमानात घट झाली होती. ३७ ते ३८ अंशापर्यंत या काळात तापमान नोंद झाले. त्यानंतर मात्र पुन्हा तापमान वाढत चालले असून २० एप्रिल रोजी ४१.२ अंश तर २१ एप्रिल रोजी ४०.६ अंश तापमानाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली.