परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:46 AM2018-05-27T00:46:22+5:302018-05-27T00:46:22+5:30

नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

Parbhani situation: Water shortage due to public toilets; Eight public toilets closed | परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
परभणी शहरामध्ये नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यासाठी वैयक्तिक शौचालयांना अनुदान देण्यात आले. शहरातील हगणदारीची स्थळे निष्काशित करुन लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे, शौचालयांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची पाणंदमुक्ती झाली. शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषितही करण्यात आले. परंतु, शहराची हगणदारीमुक्ती अल्पकाळाचीच ठरली आहे. विहीर, बोअरची पाणीपातळी घटली आणि गोरगरीबांच्या हाती पुन्हा एकदा लोटा आल्याचे दिसू लागले आहे.
शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यापैकी काही शौचालयांची पाहणी शनिवारी करण्यात आली. त्यात ८ शौचालये पाण्याअभावी बंद असल्याचे दिसून आले. शहरातील लोहगाव रोडवरील साखला प्लॉट भागातील सार्वजनिक शौचालयास भेट दिली तेव्हा या ठिकाणी पाणी नसल्याने सांगण्यात आले. हे शौचालय बंद नसले तरी नागरिकांना पाण्याची अडचण सहन करावी लागत आहे. घरुन पाणी न्यावे लागत असल्याचे दिसून आले. बागवान मोहल्ला भागातील सार्वजनिक शौचालय १५ दिवसांपासून बंद आहे. या शौचालयात पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, फरशीचे काम सुरु असल्याचे कारण देत शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. गंगाखेड रस्त्यावरील कुकुटपालन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला भेट दिली तेव्हा दोन महिन्यांपासून हे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचे सांगण्यात आले. शौचालय परिसरात घेतलेल्या बोअरची मोटार जळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. मोटार जळाल्या संदर्भात महापालिकेला कळविण्यात आले. त्यानंतर काही दिवस टँकरचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. आता हे पाणीही बंद झाल्याने शौचालयाला कुलूप ठोकावे लागले आहे.
गंगाखेडरोडवरच विकासनगर भागातील सार्वजनिक शौचालयांचीही अशीच अवस्था झाली आहे. या सार्वजनिक शौचालय परिसरातील लाईटचा बोर्ड जळाला आहे. त्यामुळे बोअरला पाणी असूनही त्याचा वापर करता येत नाही. परिणामी शौचालय बंद ठेवावे लागत आहे. १५ दिवसांपासून विकास नगरातील शौचालयही बंद आहे. रमाबाई आंबेडकरनगर, आयटीआय-१ येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील बोअर आटल्याने हे शौचालयही बंद आहेत. अशीच परिस्थिती काद्राबाद प्लॉट, जिल्हा परिषद समोरील शौचालय, अजिजियानगर, पंचवटीनगर येथील शौचालयांची झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांनाही पाणी टंचाईचा फटका बसला असून ही शौचालये बंद ठेवावी लागत आहेत.
उद्घाटनापासून शौचालय बंदच
येथील काद्राबाद प्लॉट परिसरात जिंतूर रस्त्यावर उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासून बंद असल्याची बाब नागरिकांनी बोलून दाखविली. सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनानंतर चार-पाच दिवस हे शौचालय सुरु होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत या शौचालयाचे कुलूप उघडले गेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या शौचालयाचा अजूनही नागरिकांना वापर करता आला नाही. जिल्हा परिषदेच्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली होती. मात्र हे शौचालयही काही काळच सुरु राहिले. त्यानंतर शौचालय बंद पडले आहे. या ठिकाणी पुरेसी पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालय बंद असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
आता कुठे मीटरचे काम
काद्राबाद प्लॉट भागात जिंतूर रस्त्यावरील शौचालयाची पाहणी करण्यासाठी जात असतानाच या शौचालयाला अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून हे शौचालय केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद होते. शनिवारी या ठिकाणी वीज पुरवठा घेण्यासाठी मीटर बसविले जात असल्याचे दिसून आले. मीटरची जोडणी झाल्यानंतर तरी शौचालयाचा वापर सुरु होतो की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
घराचे कामही ठप्प
सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी २४ तास वास्तव्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना १ खोली बांधून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे काम झाले आहे. परंतु, गंगाखेडरोडवरील कुकुटपालन परिसरात खोलीचे बांधकामही झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाºयांना ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शौचालयाच्या आवारातच सहारा घ्यावा लागत आहे. रखडलेले खोलीचे बांधकाम त्वरित पूर्ण केले तर कर्मचाºयांची गैरसोय दूर होऊ शकते.

Web Title: Parbhani situation: Water shortage due to public toilets; Eight public toilets closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.