परभणी : चोरी प्रकरणातील सहा आरोपी सहा तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:13 AM2019-02-05T00:13:48+5:302019-02-05T00:14:16+5:30
जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़
जिंतूर शहरातील जालना रस्त्यावरील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुममध्ये ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९़३० च्या सुमारास ५-६ व्यक्ती जेवणासाठी आले़ जेवण झाल्यानंतर बिलाचे पैसे मागितल्याने या व्यक्तींनी गोंधळ घातला़ हॉटेलचे मालक, नोकर व व्यवस्थापकाला मारहाण करून हॉटेलच्या गल्ल्यातील १२ हजार रुपये काढून घेतले़ घटनेनंतर हॉटेल मालक दत्ता कुंडलिकराव नवले यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरून गुन्हा नोंद झाला होता़
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी एक पथक तयार केले़ तसेच घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली़
४ फेब्रुवारी रोजी पहाटेच आरोपींचा शोध सुरू केला़ उपलब्ध झालेल्या वरून पथकाने या गुन्ह्यातील शेख फय्याज शेख गौस, आशिष गौतम जावळे, सय्यद फय्याज सय्यद रहीम, शेख कैफ शेख खदीर, सय्यद इम्रान सय्यद फेरोज आणि शाहेद खान सादेक खान पठाण (सर्व रा़ जिंतूर) यांना ताब्यात घेतले़ या आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर आरोपींची गुन्हा केल्याची कबुली दिली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, हवालदार शरद मुलगीर, लक्ष्मीकांत धृतराज, छगन सोनवणे, अरुण कांबळे, गणेश कौटकर, परमेश्वर शिंदे, ताजोद्दीन शेख यांनी केली़
गुन्ह्यात वापरलेली कार जप्त
४जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरविली़ काही तासांतच पोलिसांचे पथक आरोपींपर्यंत पोहचले़ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर या आरोपींकडे विचारपूस केली तेव्हा या गुन्ह्यामध्ये १ कारही वापरल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी एमएच १५ सीएच ९९०९ या क्रमांकाची कार जप्त केली असून, सहाही आरोपींना जिंतूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़