परभणी : गंगाखेड येथील टोळीप्रमुखासह सहा सदस्यांना केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:29 PM2019-04-16T23:29:34+5:302019-04-16T23:29:56+5:30
गंगाखेड व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्यासह इतर सदस्यांना पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंगाखेड व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्यासह इतर सदस्यांना पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़
टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्याविरूद्ध जबरी चोरी करताना दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराच्या सहाय्याने दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रासह दंगा करणे आदी सुमारे २२ गुन्हे गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत़ तर या टोळीतील सदस्य सतीश लिंबाजी घोबाळे, शुभम उर्फ दादा दयानंद घोबाळे, दयानंद उर्फ भुऱ्या रुखमाजी घोबाळे, गोविंद उर्फ जयपाल लिंबाजी घोबाळे, रुपेश संजय वाव्हळे, संदीप उर्फ संदेश जयपाल कांबळे, अविनाश उर्फ महादेव लिंबाजी ओगले, रावसाहेब ज्ञानोबा नागरगोजे, वैभव उर्फ बाँड रोहिदास घोडके, अनिल माणिक कांबळे, राहुल माणिक कांबळे, शिवाजी संभाजी घोबाळे, शैलेश लिंबाजी ओगले या सदस्यांविरूद्ध एकूण ३१ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे वरील आरोपींविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून टोळीप्रमुख हरिदास लिंबाजी घोबाळे यास दोन वर्षांसाठी तर दयानंद घोबाळे, रावसाहेब नागरगोजे, वैभव घोडके यांना एक वर्षासाठी तसेच शुभम घोबाळे, गोविंद घोबाळे, सतीश घोबाळे यांना ६ महिन्यांसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ, परभणी तसेच बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक लोसरवाड, पोलीस हवालदार भारती, कांदे, कटारे यांनी टोळीप्रमुख व सदस्यांना नोटीस बजावून १४ एप्रिल रोजी रेणापूर व लातूर येथे नेऊन सोडले़ यापूर्वी पोलिसांनी लिंबाजी उर्फ विजय गोविंद घोबाळे व किरण उर्फ बाळू किशनराव घुंबरे यांची टोळीही हद्दपार केली आहे़ ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी़डी़ सैदाने यांनी केली़
७ जणांचे हमीपत्र
४या टोळीतील सदस्य रुपेश वाव्हळे, संदीप जयपाल कांबळे, अविनाश लिंबाजी ओगले, अनिल कांबळे, राहुल कांबळे, शिवाजी घोबाळे, शैलेश ओगले यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे़