परभणी : आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ७४ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:13 AM2019-09-22T00:13:36+5:302019-09-22T00:14:02+5:30
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा शनिवारी दुपारी झाली़ त्यानंतर ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर म्हणाले की, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे़ आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्याकरीता चार मतदारसंघात १८ पथके स्थापन करण्यात आली असून, प्रसारित होणाऱ्या व्हिडीेओंची तपासणी करण्यासाठी ५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ १६ आदर्श आचारसंहिता कक्ष पथकांची स्थापना करण्यात आली असून, उमेदवारांच्या हिशोबाची तपासणी करण्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आली आहेत़ १६ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, १५ स्थीर पथके स्थापन करण्यात आली आहेत़ या शिवाय मतदारांना सीव्हीजील अॅपच्या माध्यमातून तक्रारी करता येणार आहेत़ तसेच २२६४०० या क्रमाकांच्या कंट्रोल रुमवरही मतदारांना संपर्क साधता येणार आहे़ २४ तास कंट्रोल रुम सुरू राहणार आहे़ जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५० हजार ६३४ तर परभणी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६ हजार २३९, गंगाखेड विधानसभा मतदार संघात ३ लाख ८८ हजार ९१५, पाथरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५३ हजार ५७३ असे एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार आहेत़ जिल्ह्यात ३ हजार ४६५ दिव्यांग मतदार असून, मतदानाच्या वेळी त्यांच्या घरून मतदान केंद्रापर्यंत आणणे व नेवून सोडण्याची व्यवस्था प्रशासन करणार आहे़ मतदारांना आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पोलचिट वाटप केल्या जाणार आहेत़ उमेदवारांना विविध परवाने मिळावेत, यासाठी जिल्हास्तरावर १ तर विधानसभा स्तरावर प्रत्येकी एक खिडकी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे़ जिंतूरमध्ये ४०७, परभणीत ३०२, गंगाखेडमध्ये ४०३ आणि पाथरीत ३९४ मतदान केंदे्र आहेत़ त्यामध्ये ५६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार ३४६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार असून, प्रशासनाने आवश्यक त्या कर्मचाºयांची यादी तयार केली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ निवडणुकीबाबत कर्मचाºयांना ६ आॅक्टोबर रोजी पहिले, १३ आॅक्टोबर रोजी दुसरे आणि २० आॅक्टोबर रोजी तिसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ जिल्ह्यात २ हजार ८२७ बॅलेट युनिट, २ हजार ८९ कंट्रोल युनिट आणि २ हजार ३२९ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध झाल्या आहेत़ उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा असून, स्वतंत्र बँक खाते उघडून त्यामधून त्यांना खर्च करावयाचा आहे़ प्रत्येक व्यवहाराची नोंद उमेदवारांना ठेवावी लागणार आहे़ बँकांनाही या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते.
८२० गुन्हेगारांची यादी तयार
पोलीस प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या कालावधीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सद्यस्थितीत ८२० गुन्हेगारांची यादी प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आली आहे़, अशी माहिती पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी यावेळी दिली़ निवडणुकीमध्ये २ हजार ३०० पोलीस कर्मचारी, २०० अधिकारी तसेच होमगार्ड व अन्य बंदोबस्त नियुक्त करण्यात येणार आहे़ अतिरिक्त कर्मचाºयांची मागणी प्रशासनाकडे नोंदविण्यात आली आहे़